लिखाणाने घडवले आयुष्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019   
Total Views |


 
 
 
 
लेखक, दिग्दर्शक व अभिनेते संदीप दंडवते. अहमदनगरसारख्या ग्रामीण भागात आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या या हरहुन्नरी कलाकाराची ही कथा...
 

एखादी व्यक्ती एका उंचीवर पोहोचली की, तिचे सर्वत्र कौतुक होते. तिची आजची उंची सर्वांना हेवा वाटावी अशी असली तरी, त्यामागे त्या व्यक्तीची प्रचंड मेहनत आणि प्रचंड वेदना असतात. दु:ख, अपयश, मान-अपमानाशी दोन हात करत ती व्यक्ती तिच्या ध्येयाप्रत पोहोचलेली असते. असाच एक प्रवास आपण आजच्या ‘माणसं’ या सदरात उलगडणार आहोत. या माणसाचं नाव आहे लेखक, दिग्दर्शक व अभिनेते संदीप दंडवते. अहमदनगरसारख्या ग्रामीण भागात आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या या हरहुन्नरी कलाकाराची ही कथा.

 

संदीप दंडवते यांची आज नाट्य व चित्रपट लेखक म्हणून ओळखत असली तरी, हा प्रवास अनेक वळणं घेऊन झालेला होता. खरंतर त्यांनी ‘आपण कधीकाळी लेखक होणार आहोत’ असं सांगितलं असतं, तर लोक त्यांना वेडं ठरवून लोक मोकळे झाले असते. स्वत: संदीप यांनादेखील कधी वाटलं नव्हतं, आपण एक आघाडीचे लेखक होऊ. मात्र, आयुष्यात अशी काही वळणे येतात की, सर्वच गोष्टी बदलून जातात. संदीपना लष्कराचे वेड होते. काहीही झालं तरी, लष्करात भरती व्हायचेचं, असं त्यांनी मनाशी पक्क केलं होतं. मात्र, संदीप यांचे दुदैव की, सैन्यभरतीत त्यांची उंची दोन सेंमीने कमी पडली. आता पुढे काय करायचं? हा प्रश्न निर्माण झाला. यावेळी त्यांची बहीण मदतीला धावून आली आणि अकाऊंटिंगचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. कारण, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने काहीतरी कामधंदा मिळविणे गरजेचे होते. संदीप यांनी २००१ साली वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आणि लगेचच त्यांना औरंगाबाद येथील व्हिडिओकॉम कंपनीमध्ये डिस्पॅचरचे काम मिळाले. येथे त्यांना गाडी भरायचे काम करावे लागायचे. मात्र, गरजवंतांना पर्याय नसतो, त्याप्रमाणे त्यांनी हेही काम वर्षभर केले. अखेर २००२ साली त्यांनी हे काम सोडले आणि नगरला परत आले.

 

संदीप यांच्या पुढे पुन्हा आता पुढे काय करायचं? हा प्रश्न उभा राहिला. यावेळी त्यांचा भाऊ त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्यांनी सहा महिने रिक्षा चालवली. यादरम्यान, एका मित्राच्या सोबतीने गाड्यांमधील पेट्रोल चक्क चोरायची त्यांना सवय लागली. चोरलेल्या पेट्रोलपासून त्यांना दिवसाकाठी २०० रुपये मिळायचे. मात्र, एक दिवस पोलिसांनी त्यांना पकडून प्रचंड चोप दिला. मग मात्र जाणीव झाली की, आपण ज्यासाठी धडपडतोय तो पैसा चोरीच्या मार्गाने कमवून जगण्यात अर्थ नाही. एकदा पोलिसांच्या तावडीतून सुटलो, मात्र परत पकडलो गेलो, तर आयुष्यभर तुरुंगामध्येच बसून राहावे लागेल. आपण तुरुंगात गेल्यानंतर घरच्यांचं काय? या प्रश्नाने भानावर येऊन ते पेट्रोलचोरी सोडून एक नवीन रिक्षा घेऊन पुन्हा कामाला लागले. हळूहळू याच कामात त्यांचा जम बसला आणि यातून आणखी चार रिक्षा विकत घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. यात झालेल्या फायद्यातून त्यांनी पान टपरी काढली. यानंतर संदीप यांच्या अपेक्षा वाढतच गेल्या आणि जे होऊ नये असं वाटतं तेच झालं. संदीप यांनी आपल्या चार रिक्षा आणि टपरी विकून नवीन व्यवसाय करायचे ठरवले. मात्र, पुन्हा एकदा संदीप यांच्या आयुष्यात संकटाने प्रवेश केला. सर्व विकून आलेला पैसा अनपेक्षित संकटात संपून गेला. सगळं संपलं होतं. मात्र, संदीप यांची जिद्द कायम होती. पुन्हा तोच प्रश्न होता, आता पुढे काय?

 

संदीप यांच्या आयुष्यात आलेलं हे संकटच ते लेखक म्हणून उदयास येण्यास कारणीभूत ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, या अगोदर लेखकातील ‘ल’, एकांकिकेतील ‘ए’ आणि चित्रपटातील ‘च’देखील त्यांना माहिती नव्हता. करण्यासारखं हाती काही न राहिल्याने संदीप यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला घेतले. यानंतर ते शिवाजी महाराज, किल्ले भटकंती आणि पोवाड्यांच्या तर अगदी प्रेमात पडले. बाबासाहेब देशमुख आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या ऊर्जेने त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली. संदीप सांगतात की, “जाणता राजा हे नाटक माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. मित्र विशाल वाकळे याने या नाटकाच्या प्रसिद्धीसाठी पथनाट्य करण्याची संधी दिली आणि लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून माझी सुरुवात झाली. यानंतर काहीही माहिती नसताना एकांकिका सादर केली. अनेक समस्या, अपयश, मान-अपमान, दु:ख वाट्याला आलं. मात्र, कधीच मागे वळून पाहिलं नाही.” संदीप यांनी आज महाराष्ट्रातील अशी एकही एकांकिका स्पर्धा किंवा नाटक स्पर्धा नाही जिथे पारितोषिक पटकावले नाही. त्यांनी आतापर्यंत ‘हृदयानंतर,’ ‘गुरफट,’ ‘लबाड बिबट्या ढोंग करतोय,’ ‘मुकाक्रोश,’ ‘फ्लॅश,’ ‘दोन वजा दोन,’ ‘हिय्या,’ ‘दोन रात्रीचा उत्तरार्ध,’ ‘मोहळ माशी,’ ‘चोर एके चोर,’ ‘माईक,’ ‘तुज आहे लॉजपाशी,’ ‘टिळा,’ ‘रंगबावरी’ अशा अनेक एकांकिका लिहिल्या. ‘आय अ‍ॅम दी बिगिनिंग,’ ‘एक्सक्ल्युझिव्ह,’ ‘शापित माणसाचे गुपित,’ ‘दिवस तुझे हे फुलायचे,’ ‘गवळ्याची रंभा’ ही दोन अंकी नाटकं लिहिली. ‘माझ्या बायकोचा प्रियकर,’ ‘विठ्ठल,’ ‘वाय,’ ‘भॉ,’ ‘VIP गाढव,’ ‘यारी दोस्ती’ असे अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. यासोबतच अनेक विषयांवर त्यांचे लेखन सुरु आहे. पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@