जगणं आणि मरणं फक्त वन्यजीवांसाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
बीड जिल्ह्यातील शिरूरच्या तागडगाव गावात निसर्गप्रेमी दाम्पत्याने वन्यप्राण्यांचे अनाथालय उभे केले आहे. हे अनाथालय उभे करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे सिद्धार्थ आणि सृष्टी सोनावणे.
 

बाबा आमटे व त्यांचं प्राणीप्रेमी सर्वश्रुत आहे. त्यांच्या हेमलकसाविषयी आपण सर्वजण ऐकत आलो आहोत. त्याविषयी आपल्याला कुतूहलदेखील असतं. मात्र, महाराष्ट्रात प्राण्यांसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे बाबा आमटे व मंदाकिनी आमटे हे एकमेव नसून प्राणीप्रेमापोटी आपलं सर्वस्व अर्पण करणारे आणखी एक जोडपं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. प्रसिद्धीझोतात नसल्याने आणि त्याचं काम जनतेपर्यंत पोहोचलं नसल्याने कदाचित तुम्हाला या जोडप्याविषयी माहिती नसावं. बीड जिल्ह्यातील शिरूरच्या तागडगाव गावात निसर्गप्रेमी दाम्पत्याने वन्यप्राण्यांचे अनाथालय उभे केले आहे. हे अनाथालय उभे करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे सिद्धार्थ आणि सृष्टी सोनावणे. दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून सर्वज्ञात बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यातील तागडगावचा हा पट्टादेखील दुष्काळग्रस्त भागात येतो. या ठिकाणी या जोडप्याने जवळपास १५ एकर परिसरात प्राण्यांसाठी अनाथालय सुरू केले आहे. सोनावणे पती-पत्नी या अनाथालयामध्ये जखमी, आजारी वन्यजीवांवर उपचार करतात. फक्त उपचार करून जखम बरी होत नसते, हे या जोडप्याला माहिती असल्याने ते जखमी प्राणी-पक्ष्यांवर पोटच्या गोळ्याप्रमाणे जीव लावतात. लांडगा, तरस यांच्याबरोबरच साप, वानर, हरीण, घुबड अशा अनेक प्राण्यांचा जीव या जोडप्याने वाचवला आहे. यासोबतच हे दोघे साप, सरडे, पाली यांच्याविषयीचे गैरसमज दूर करून अंधश्रद्धा निर्मूलनाचेही कार्य करतात.

 

 
 

सिद्धार्थ आणि सृष्टी यांच्या कामाची सुरुवातदेखील त्यांच्या कामाइतकीच रंजक आहे. या कामाची प्रेरणा कशी मिळाली याविषयी सिद्धार्थशी बोलताना त्याने सांगितले की, “माझे बालमित्र भिल्ल समाजातले असल्याने मी त्यांच्यासोबत मासे, खेकडे पकडायला रानावनात भटकायचो. आमच्या परिसरातील एकही नदीनाला असा नाही, जिथे आम्ही भटकलो नाही. आम्ही असंच भटकत असताना मी व माझ्या मित्रांनी इरुळा पकडला. सापासारखा दिसणारा हा प्राणी पकडल्यानंतर आमच्यात साप पकडायचा कॉन्फिडन्स आला आणि ठरवलं की, आता काहीही झालं तरी साप पकडायचाच. मग मी वृत्तपत्राच्या माध्यमातून सापाविषयीची माहिती मिळवत गेलो आणि सगळ्या प्रकारचे साप पकडायला शिकलो. अशाप्रकारे मी सर्पमित्र आणि प्राणीमित्र कधी झालो, हे कळलेदेखील नाही. यात माझ्या मित्रांचा आणि सृष्टीचा मोठा वाटा होता. तसं पाहायला गेलं तर सृष्टी माझ्या मामाची मुलगी आणि माझी बालमैत्रीण. सृष्टी माझी बालमैत्रीण असल्याने आम्ही अनेकदा सोबत साप पकडायचो. यामुळे तिलादेखील प्राण्यांविषयी आवड निर्माण झाली.” परिसरात सर्पमित्र अशी ओळख झाल्यानंतर सिद्धार्थ व सृष्टीला अनेक ठिकाणांहूनही रात्री-अपरात्री फोन यायला लागले. मग हळूहळू इतर प्राण्यांना काही जखमा झाल्या किंवा कोणत्या प्राण्यांना काही झालं तरी त्यांना फोन यायला लागले. त्यातूनच जखमी, आजारी, वन्यजीवांच्या पुनर्वसनासाठी काम करण्याचा निर्णय या दोघांनी मिळून घेतला. यानंतर आम्ही ‘वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड सँक्च्युरी असोसिएशन’ (डब्ल्यूपीएसए) ही संस्था स्थापन केली आणि तागडगावमधील आमच्या जागेवर आम्ही हा प्रकल्प सुरू केला. लहानपणी कुत्रा, मांजर यांना काही जखमा झाल्या की त्यांना पकडून घरी आणायचो, त्यांच्यावर औषधोपचार करायचो, हा अनुभव आमच्या गाठीला असल्याने व प्राण्यांविषयी शास्त्रीय माहिती मिळविल्याने जास्त त्रास झाला नाही. या संस्थेअंतर्गत मी आणि माझे मित्र जखमी प्राणी गोळा करायचो आणि त्यांच्यावर उपचार व त्यांचे पालकत्व सृष्टी यांनी निभवायचे, हे आमचं एक सूत्रच बनून गेले होते.

 

 
 

सिद्धार्थ आणि सृष्टी यांची एकच आवड असल्याने आणि दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्याने त्यांनी २०१० साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्नदेखील एक चर्चेचा विषय होता, कारण मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या सौताडा घाटातील रामेश्वर मंदिर परिसरातील जंगलात या दोघांनी पक्षीदिनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे फुलांच्या हाराऐवजी या दोघांनी सर्पाचे हार एकमेकांच्या गळ्यात घातले. पाहुण्यांनी तांदळाची अक्षता न टाकता बियांच्या अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद दिले. तसेच यावेळी आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते सव्वाशे रोपट्यांचे रोपण या दोघांनी करून घेतले. यावरूनच निसर्ग आणि प्राणी हा यांच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे, हे लक्षात येते.

 

 
 

२००४ सालीसर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र’ सुरू केले. या वन्यजीव पुनर्वसन केंद्रामध्ये तहानलेला लांडगा, तरस, देवी रोगामुळे अंध झालेला मोर, गारपिटीने जखमी झालेले पक्षी, शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडलेले हरीण, माकड, उदमांजर, घोरपड, घुबड, तीतर, बगळे, पोपट, कावळे, साप, अजगर असे प्राणी-पक्षी वन्यजीव येतात, राहतात आणि निघूनदेखील जातात. गावापासून व माणसांपासून दूर माळरानावरचा हा प्रकल्पच या दोघांचे कुटुंब बनला आहे. येथील प्राणी-पक्षीच त्यांच्या कुटुंबातील सदस्य असून पाहुणेदेखील तेच आहेत. त्यांचे संगोपन करणे, हाच या दोघांचा दिनक्रम असतो. आता इथपर्यंत पोहोचणे म्हणजे सोपे नव्हतेच. बीडसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील या कुटुंबाचा हा प्रवास अनेक अडथळ्यांवर मात करून आजही सुरूच आहे. समस्या अनेक असतात पण त्यावर काही मार्गही असतातच असं या दोघांचं मत. त्यामुळे प्राण्यांसाठी आणि पक्षांसाठीच जगायचं आणि त्यांच्याचसाठी मारायचं असं या दोघांनी ठरवून टाकलं आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@