घाबराघाबरी आणि राहुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019   
Total Views |


राजकुमार राहुल गांधींना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. नोटीस यासाठी की राहुल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात म्हणून त्यांनी स्त्रीला पुढे केले आहे.” आता ही स्त्री कोण? तर भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन. महिला आयोगाने काय किंवा कोणता अर्थ घेऊन त्यांना नोटीस पाठवली ती गोष्ट अलहिदा. पण राहुल गांधींच्या या विधानावर वाटते की, राहुल गांधी यांच्या मते देशाच्या संरक्षणमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी संरक्षण मंत्रालयासंदर्भातल्या कोणत्याही विषयावर बोलू नये का? निर्मला सीतारामन यांच्या अखत्यारीतल्या असलेल्या विषयावर त्यांना बोलण्याचा हक्क नाही? का, कारण त्या एक स्त्री आहेत म्हणून? अरेरे! काँग्रेसची किती ही शोकांतिका. याच राहुल गांधींच्या आजी देशाच्या पंतप्रधान होत्या. तेव्हा कोण घाबरले होते म्हणून त्यांना पंतप्रधान बनवले? राहुलच्या आई सोनिया यांचेही नाव काँग्रेसींनी पंतप्रधान म्हणून चालवले. इतकेच नव्हे तर त्या पक्षाच्याही अध्यक्षा होत्या. मग त्यांना कोण घाबरले होते म्हणून हे पद दिले होते. आताही निवडणुका आल्या की, पाच वर्ष गायब असलेल्या प्रियांका गांधी नेमक्या निवडणुकीमध्ये भाषण, दौरे वगैरे करतात, मग कोण घाबरतं म्हणून त्या नेमक्या निवडणुकीमध्येच येतात. राहुल गांधींना असे घाबरण्याबिबरण्याचे चांगलेच अनुभव आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल प्रकरणावरून राहुल गांधींना चांगलेच धोबीपछाड केले. तेव्हा एक स्त्रीही हुशार बुद्धिमान कर्तृत्वशील असू शकते, हे नाकारून राहुल गांधींनी उद्गार काढले की, पंतप्रधान घाबरले म्हणून त्यांनी स्त्रीला पुढे केले. त्यांच्या विधानातला स्त्रियांना कमी लेखणारा भाव लपता लपत नाही. राहुल तुम्ही स्वतःला हिंदू आणि ब्राह्मणही समजायला लागले आहात. मग या देशातल्या महालक्ष्मी, सरस्वती या रूपाबरोबरच देवीचा दुर्गा-काली अवतार तुम्हाला माहिती आहे की नाही? दुष्ट प्रवृत्तींचा अंतिम संहार करायला देवालाही स्त्रीरूपी देवीलाच विनवावे लागले आहे. स्त्रीला घाबरून नाही तर तिच्या शक्तीबुद्धी आणि कर्तृत्वामुळे ते स्थान तिला मिळाले आणि मिळते. पण ते राहुल गांधींना कसे कळणार? कारण जानवं घालून आणि टिळा लावून धर्म आणि समाज संस्कार येत नसतात.

 

एक था टायगर, एक शेषनाग

 

एका माणसाला स्वतःला माणूस म्हणून घेण्यापेक्षा जंगलातला वाघ म्हटलेले आवडते. पेंढा भरलेला मेलेला वाघ किंवा सर्कशीतला दुसर्‍यांच्या तालावर नाचणारा वाघ, हे वाघच असतात म्हणा. तर या माणसाला इतके प्राणीप्रेम, इतके प्राणीप्रेम आहे की, माणसाच्या अंतःकरणातल्या दुःखाचा ठाव घेण्यापेक्षा विमानात बसून खाली पशुुपक्ष्यांचे फोटो काढण्यात त्याला मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो. जेव्हा तेव्हा या माणसाच्या जिव्हेवर वाघ, सिंह, कावळे वगैरे पशुपक्ष्यांची नावे थयथय नाचत असतात. आता पशुपक्ष्यांना कोथळे म्हणजे पुस्तकी शब्दात आतडी आणि वस्तीपातळीवर शब्द वजडी आवडते, हेही सांगायलाच नको. कोथळे उर्फ आतडी उर्फ वजडीचा उल्लेख यासाठी की स्वतःला वाघ समजणार्‍या माणसाच्या शब्दात कोथळा शब्दही असायचाच असायचा. हेच प्राणीप्रेम त्यांच्या राजकुमारामध्येही (राजकुमार काय दिल्लीचाच असतो का? महाराष्ट्रातसुद्धा आहेत) उतरले तर नवल नाही. तेही अधूनमधून बारीक आवाजात वाघाचा बच्चा वगैरे म्हणतात. पण परदेशी पेंग्विनवरचे त्यांचे पहिले प्रेम लपून राहिले नाहीतर थोडक्यात या माणसाच्या कॅमेर्‍यामधून फोटो काढून घेऊनच महाराष्ट्रातील प्राणीमात्र धन्य धन्य होतात. आता या स्वतःला वाघ म्हणवून घेणार्‍या माणसांचे वाघावरून दुर्लक्ष झाले की काय, असे वाटू लागले आहे. हो, खरेच ते स्वतःच असे म्हटले की, मी आता सुस्त अजगराला ढोसकण्यासाठी फिरतोय. वाघ, सिंह, कावळे वगैरे वरून आता डायरेक्ट अजगरसुद्धा या माणसाच्या यादीत आला आहे. आता या स्वतःला वाघ मानणार्‍या माणसाला कोणी सांगावे की, सुस्त अजगराला ढोसकून काय होईल? मुळात या माणसाला कोणी सांगावे की, ज्याला हा माणूस सुस्त अजगर समजत आहे तो शेषनाग आहे आणि या शेषनागाच्या आधारावरच या माणसाचे सत्ता सिंहासन उभे आहे. आणि हो, मोठा अजगर वाघालाही गिळू शकतो. पण शेषनागाचाी उपयुक्तता म्हणा किंवा अजगराचा विळखा म्हणा, या स्वतःला वाघ समजणार्‍या माणसाला कळतच नाही. काय करणार? हा माणूस स्वतःला वाघ समजतो. स्वतःला वाघ समजणार्‍यांकडून माणसासारखी बुद्धी आणि तारतम्याची आशाच करू शकत नाही. बाकी आवाज कुणाचा सुरू राहू द्या..उद्या असे नको व्हायला, एक था टायगर..


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@