मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह अखेर पोलिसांना पाच दिवसांच्या तपासानंतर हाती लागला आहे. हत्येमागे त्यांचेच सहकारी असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. कल्याणमधूल हाजी मलंग रोडवर काकडवाल गावातील डबक्यात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. त्यांच्या खिशात बँकेचे ओळखपत्र आढळून आले. पोलिसांना चेहरा ओळखता येत नव्हता, मात्र अंगावरील कपड़े आणि खिशातील ओळखपत्रावरुन कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह ओळखला आहे.
याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला या प्रकरणात आरोपी सरफराज शेखला अटक केली आहे. तर अन्य आरोपींनाही ताब्यात घेतल्याचे समजते. एचडीएफसीच्या कमला मिल येथील लोअर परळ शाखेत 2007 मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) म्हणून सिद्धार्थ संघवी बँकेत रुजू झाले होते. 11 वर्षांच्या कालावधीत तीन वेळा मिळालेल्या पदोन्नतीमुळे सहकाऱ्यांचा जळफळाट होत होता. यातूनच सहकाकाऱ्यांनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी सायंकाळी संघवी कंपनीच्या पार्किंगमध्ये असताना आरोपींनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून कल्याणच्या हाजीमलग रोडवरील काकडवाल गावाजवळ फेकून दिला.
संघवीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार घरातल्यांनी नोंदवल्यानंतर पोलिस कामाला लागले. या हत्येच्या संशया प्रकरणी पोलिसांनी संघवी यांचे साथीदार आणि चालक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सिद्धार्थ यांची हत्या केल्याची कबुली चौघांपैकी एकानेच पोलिसांकडे दिली होती. चौघा संशयितांपैकी दोघेजण सिद्धार्थ यांचे सहकारी आहेत, तर एक कॅब चालक आणि एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. 20 वर्षीय कॉन्ट्रॅक्ट किलर रईस उर्फ सरफराज शेखने सिद्धार्थ यांचा मृतदेह कल्याणजवळ विल्हेवाट लावल्याची माहिती पोलिसांना दिली. तर संघवी यांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये रक्ताचे वर्ण दिसून आले आहे.