श्रीनगर : देशभरात ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना, काश्मीर खोऱ्यात मात्र रमझानच्या या पवित्र सणाला नापाक गोळीबार आणि फुटीरतावाद्यांच्या दगडफेकीचे गालबोट लागले आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी नौशेरा सेक्टरमधील सीमावर्ती भागात केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर नमाज अदा केल्यानंतर फुटीरतावादी मानसिकतेच्या तरुणांनी दगडफेक केल्याने जवानांनी लाठीमार व अश्रूधुराच्या केलेल्या माऱ्यात एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला.
पाकच्या सैनिकांनी आज सकाळी नौशेरा सेक्टरमधील सीमेवर असलेल्या लष्करी तळांवर जोरदार गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारात एक जवान शहीद झाला. विकास गुरुंग असे या जवानाचे नाव आहे. अर्निया सेक्टरमध्येही पाकी सैनिकांनी गोळीबार केला. या दोन्ही गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
नमाजानंतर दगडफेक
अनंतनाग जिल्ह्यातील मशिदीत आज सकाळी ईदेचा नमाज अदा करण्यात आल्यानंतर शेकडो फुटीरतावादी मानसिकतेच्या तरुणांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावत, जवानांच्या वाहनावर दगडफेक केली. अनेकांच्या हातात पाकिस्तान व इसिसचे झेंडे होते. यात काही जवान जखमी झाल्यानंतर जवानांनी आधी लाठीमार आणि नंतर अश्रूधुराचा मारा केला. जवानांनी हवेत गोळीबारही केला. या वेळी झडलेल्या संघर्षात शिराज अहमद या नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता, त्याचा मृत्यू झाला. उत्तर काश्मीरच्या सोपोर आणि कुपवाडा जिल्ह्यातही दगडफेक करणारे तरुण आणि जवानांमध्ये संघर्ष उडाल्याची माहिती आहे.
मिठाईचे वाटप नाही
पाकी सैनिकांकडून सतत सुरू असलेल्या नापाक कारवायांमुळे पंजाबच्या अट्टारी-वाघा सीमेवर बीएसएफच्या जवानांनी या वर्षी पाक सैन्यांना मिठाई दिली नाही. ईदनिमित्त दरवर्षी या सीमेवर मिठाईची देवाण-घेवाण होत असते. मात्र, या वर्षी जवानांनी पाकी सैनिकांना मिठाईचे वाटप केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.