वलींची वळवळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018   
Total Views |


 
 
 
मागील लेखामध्ये आपण वलींविषयी माहिती घेतली. तथापि, सर्व माहिती देता आलेली नाही. ती आपण या लेखात बघूया. मागील लेखात आपण वलींच्या वर्गीकरणाचे ४ प्रकार बघितले. या लेखात आपण उरलेले २ प्रकार बघू.
 

.निर्माण होण्याची प्रक्रिया (Mode of Occurrence) - काही वेळा काय होते, की एखाद्या खूप मोठ्या परिसरामध्ये (अगदी शेकडो-हजारो किमीसुद्धा) अनेक लहान लहान वली असतात. त्यांचे वैयक्तिक प्रकार काहीही असो पण, त्या पूर्ण सिस्टिमचा (System) एकात्मिक (As a Whole) अभ्यास केल्यास त्या पूर्ण सिस्टिमचा एकच ठराविक आकार आपल्याला दिसतो. यावरून वलींचे खालील भाग पडतात -

 

.अँटिक्लाईनोरियम (Anticlinorium) - नावाप्रमाणेच यांचा एकात्मिक आकार अँटिक्लाईनसारखा, म्हणजेच वरून वर्तुळाकार असतो. या वलीचे एखाद्या भागात असणे हे तो संपूर्ण भाग एकत्रच वर उचलला गेल्याचे लक्षण आहे.

 

.सिनक्लाईनोरियम (Synclinorium) - नावाप्रमाणेच यांचा एकात्मिक आकार सिनक्लाईन सारखा, म्हणजेच खालून वर्तुळाकार असतो. या वलीचे एखाद्या भागात असणे हे तो संपूर्ण भाग एकत्रच खाली दबला गेल्याचे लक्षण आहे.

 

.अवांतर (Miscellaneous) - या प्रकारात काही असे वली आहेत, त्यांची वर्गवारी इतर कोणत्याच प्रकारात करता येत नाही. हे प्रकार बघू.

 

.मोनोक्लाईन (Monocline) - या प्रकारात वलीच्या केवळ एकाच बाजूला वळण असते. याची दुसरी बाजू ही दुसऱ्या वलीला जोडलेली असते किंवा निराळ्या उंचीवर सपाट पसरलेली असते.

 

. ड्रॅग वली (Drag Fold) - आपणाला माहीतच आहे की, खडकांचे एकमेकांवर स्तर असतात. यातील काही स्तर हे तुलनेने कमजोर असतात. कधीकधी एका कमजोर स्तराच्या दोन्ही बाजूंना चांगल्या मजबूत खडकांचे स्तर असतात. जेव्हा हे स्तर विविध बलांमुळे एकमेकांवर घासले जातात, तेव्हा यातील कमजोर स्तर आतल्या आत थोडे फाटतात व त्यांचे तेथेच लहान लहान वली तयार होतात. हे वली सरळपणे दिसत नाहीत.

 

.घुमट (Dome) - काही वेळा भूगर्भातील विविध बलांमुळे एखाद्या परिसराचा मधलाच भाग वर उचलला जातो. त्यामुळे त्याला घुमटासारखा आकार प्राप्त होतो. अशा वलींचे लिम्ब हे सर्व बाजूंनी खालच्याच दिशेकडे झुकलेले असतात.

 

.खोलाटी (Basin) - घुमटाच्या बरोबर उलट काही वेळा जर परिसराचा मधलाच भाग खाली गेला, तर त्याच्या सगळ्या लिम्ब वरच्या दिशेने जातात. याला ‘खोलाटी’ असे म्हणतात.

 

 
 

तर अशा प्रकारे वली हे सहा निरनिराळ्या प्रकारांत विभागता येतात. हे सर्व प्रकार एकमेकांपासून स्वतंत्र तर आहेतच पण, काही वेळा एकाच वलीमध्ये अनेक प्रकार सामावलेले असल्याचे लक्षात येतेवलींचा अभ्यास करणे अभियांत्रिकीच्या जगात महत्त्वाचे आहे. कारण, बऱ्याचदा पर्वत किंवा टेकड्या म्हणजे मोठ्या आकाराचे वलीच असतात. वली हे भूगर्भातील प्रचंड बलांमुळे निर्माण होत असल्यामुळे बऱ्याचदा आदिबलित (Pre-stressed) असतात. अशा वलींमध्ये कोणतेही खनन (Excavation - बोगदे खणणे, खाणकाम, इत्यादी.) करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते, अन्यथा अपघातांचा धोका असतो. पर्वत तयार होण्याच्या प्रक्रियेला ‘पर्वतीकरण’ (Orogenesis) असे म्हटले जाते. जेव्हाही दोन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना चिकटतात व एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यापासून निर्माण झालेल्या बलामुळे पृथ्वीचे कवच (Crust) वर उचलले जाऊन पर्वत तयार होतात. काही वेळा ज्वालामुखीमुळेही पर्वत तयार होतात. आता आपण जगातील काही वलीय पर्वतांची माहिती घेऊ. सुरुवात भारतापासूनच करू.

 
.हिमालय (Himalaya) - आपणा सर्वांच्या चांगल्याच परिचयाचा असलेला हा पर्वत! या लेखमालेत अनेकदा याचा उल्लेख आला आहे. भारतीय टेक्टॉनिक प्लेट ही आशिया प्लेटला येऊन मिळाल्यामुळे जेथे खंड-खंड सरहद्द(Continent-Continent Boundary) आहे, तेथेच हा पर्वत तयार झाला आहे. हा तसा तरुण पर्वत म्हणता येईल, अंदाजे ५० दशलक्ष वर्षे हे त्याचे वय असावे असा साधारण समज आहे. भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान व चीन या देशांमध्ये हा पर्वत पसरलेला आहे. जगातील सर्वात उंच शिखर म्हणजे ‘सागरमाथा’ (Mt. Everest) हेही याच पर्वतात आहे. याची उंची आठ हजार, ८४८ मीटर इतकी आहे. याशिवाय हिमालयात एकूण १० शिखरे अशी आहेत, ज्यांची उंची आठ हजार मीटरपेक्षा जास्त आहे, तर एकूण ५० शिखरे अशी आहेत, ज्यांची उंची सात हजार, २०० मीटरपेक्षा जास्त आहे. भारतीय प्लेट ही आशिया खंडाखाली चालली असल्यामुळे हिमालयाची उंची ही साधारण एक सेंटीमीटर प्रतिवर्ष या वेगाने वाढत आहे. त्यामुळे हा परिसर कायमच भूकंपप्रवण असून काही मोठे भूकंप या परिसरात झालेले आहेत.
 
.रॉकी (Rocky) - हा पर्वत उत्तर अमेरिका खंडात वसलेला आहे. कॅनडापासून ते थेट नवीन मेक्सिको राज्यापर्यंत हा पर्वत उत्तर-दक्षिण पसरलेला आहे. याचा जन्म हा साधारणपणे ८० दशलक्ष वर्षांपूर्वी झाला आहे. याची सर्वाधिक उंची ही माऊंट एलबर्ट, कोलोरॅडो (Mt. Albert, Colorado) येथे सुमारे चार हजार, ४०१ मीटर एवढी आहे. या पर्वतातील खडक हे अत्यंत प्राचीन असून त्या खडकांचे वय हे सुमारे १.७ अब्ज वर्षे असावे असा अंदाज आहे.
 
.अँडीज (Andes) - या पर्वताची रांग ही जगातील सर्वात लांब खंडीय पर्वतरांग आहे. हिची लांबी जवळजवळ सात हजार किलोमीटर, तर जाडी ही २०० ते ७०० किलोमीटर आहे. या पर्वताची सरासरी उंची ही सुमारे चार हजार मीटर आहे, तर सर्वाधिक उंची ही अर्जेंटिना येथील अकोनकागुआ (Aconcagua) या शिखरावर सुमारे सहा हजार, ९६२ मीटर आहे. हा पर्वतसुद्धा दक्षिण अमेरिकन प्लेट (South -merican Plate) व नाझ्का प्लेट (Nazca Plate) या दोन प्लेट्सच्या एकत्र येण्यामुळेच तयार झाला आहे. यातील नाझ्का प्लेट ही सामुद्रिक आहे. म्हणून येथे सबडक्शन झोनही तयार झाला आहे. म्हणूनच पर्वताखेरीज या भागात ज्वालामुखीही आहेत.
 
. आल्प्स (Alps) - युरोप खंडात आहे. सुमारे एक हजार, २०० किलोमीटर लांबीचा हा पर्वत अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. या पर्वताचा जन्म लाखो वर्षांपूर्वी युरोप व आफ्रिका खंड एकमेकांना चिकटल्यामुळे झालेला आहे. याची सर्वाधिक उंची ही माँट ब्लांक (Mont Blanc) येथे चार हजार, ८१० मीटर एवढी आहे, तर सरासरी उंची ही अडीच हजार मीटर आहे. या पर्वतात युरोपातील अनेक प्रमुख नद्यांचा उगम होतो. तर, अशा प्रकारे आपण वली म्हणजे काय, त्यांचे प्रकार, त्याचे अभियांत्रिकीमधले महत्त्व तसेच जगातील काही वलीय पर्वतांची थोडक्यात माहिती घेतली. संदर्भ Textbook of Engineering and General Geology - Parbin Singh - Katson Publishing House व इंटरनेट
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@