‘काँग्रेस’ हटाव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018   
Total Views |



लेखाचे शीर्षक वाचून हा लेख राजकीय आहे की काय असे वाटेल. परंतु, या लेखाचा काँग्रेस पक्षाशी सुतराम संबंध नाही. या लेखात आपण माहिती घेणार आहोत, कधीकाळी परदेशातून भारतात आलेल्या आणि येथील परिसंस्थेला उपद्रवी ठरलेल्या ‘काँग्रेस गवत’ या एका वनस्पतीची.


पुण्याची जीवनदायिनी असलेल्या मुठा नदीची सध्या प्रदूषणामुळे झालेली दुरावस्था दूर करून तिला पुन्हा स्वच्छ आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘जीवितनदी’ हा एक पर्यावरणप्रेमी गट तळमळीने काम करतो. सध्या या गटाच्या संस्थापक सदस्या आदिती देवधर आणि इतर मंडळी दर रविवारी सकाळी विठ्ठलवाडीला मुठा नदीच्या किनारी स्वच्छता, वृक्षारोपण, घाट उत्खनन इत्यादी कामं करतात. त्यांच्याबरोबर एकदा गेलो असता आदितीताई कसलीतरी छोटी रोपं उपटून टाकताना दिसल्या. त्यांना त्याबद्दल विचारलं असता, त्या म्हणाल्या, “हे ‘काँग्रेस गवत’ आहे. हे बेसुमार वाढतं आणि इतर स्थानिक वनस्पतींना वाढू देत नाही. म्हणून ते उपटून टाकायचं.” एकंदरच हे ‘काँग्रेस गवत’ नेमकं काय प्रकरण आहे, ते जाणून घ्यावंसं वाटलं. ‘काँग्रेस गवत’ हे एक प्रकारचं परदेशी तण आहे. त्याचं शास्त्रीय नाव ‘पार्थेनियम हिस्टेरोफोरस’(parthenium hysteroforus) असं असून ती Asteraceae कुळातील वनस्पती आहे. ही वनस्पती मूळची मेक्सिको, उत्तर अमेरिका, वेस्ट इंडिज या भागातील. पण ही ‘साम्राज्यवादी’ वनस्पती आज जगभर पसरली आहे. भारतात तिला ‘गाजर गवत’ असंही म्हणतात. आता, ही वनस्पती भारतात नेमकी आली कशी? त्याची एक कथा सांगितली जाते ती अशी १९५० च्या दशकात भारतात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी भारत सरकारने ‘PL ४८०’ नामक एक योजना आखली. या योजनेनुसार, अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात गहू आयात करण्यात आला. गाजर गवताचं बी या गव्हात मिसळून भारतात आलं. येथील मातीत ते रुजलं आणि फोफावायला लागलं. (हे तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात घडलं म्हणून या गवताला ‘काँग्रेस गवत’ हे नाव पडलं असं म्हणतात! खरं-खोटं आपल्याला माहीत नाही!)

 
काही तज्ज्ञांच्या मते, १९०० सालापूर्वीच गाजर गवताचं बी भारतात आलं होतं. १९५५ च्या सुमारास पुण्यात सर्वप्रथम काँग्रेस गवत रुजलेलं आढळून आलं आणि पुढील काही वर्षांतच आसेतू हिमाचल त्याने आपलं साम्राज्य विस्तारलं. भारतच नव्हे, तर आशिया खंडाच्या अन्य भागांत आणि आफ्रिका-ऑस्ट्रेलियामध्येही या गवताने कब्जा केला आहेसाधारणपणे दोन ते तीन फूट सरळ वाढणाऱ्या या गवताला पांढरी बारीक बारीक फुलं येतात. फुलांमध्ये काळ्या रंगाच्या तिळासारख्या सूक्ष्म बिया असतात. एक गाजर गवताचं रोप एका वेळी हजारो बिया निर्माण करतं. वाऱ्याबरोबर आणि पाण्याबरोबर या बिया वाहून नेल्या जातात आणि त्या जिथे जातात तिथे रुजतात. गाजर गवताचं आयुष्य चार महिन्यांचं असतं पण, याची बी रुजल्यानंतर चार आठवड्यांमध्ये ते झाड मोठं होऊन प्रजननाला सुरुवात करतं. आपल्या चार महिन्यांच्या छोट्याशा आयुष्यात ते लाखो बिया निसर्गात सोडतं आणि आपली प्रजा वाढवतं. रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी, शेतात, माळरानावर, कुठेही हे गवत फोफावलेलं दिसतं. दुर्दैवाने भारतात गाजर गवताला नियंत्रणात ठेवणारा कुठलाही कीटक, प्राणी वा अन्य नैसर्गिक शत्रू अस्तित्वात नाही. त्यामुळेचं ते कायच्या काय वाढतं.
 

‘काँग्रेस गवता’चा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे ते स्थानिक परिसंस्था उद्ध्वस्त करतं. एकतर ते मातीतील सगळी पोषणमूल्य शोषून घेतं, त्यामुळे जिथे ते फोफावतं तिथे इतर स्थानिक गवतवर्गीय वनस्पती आणि फुलझाडं वाढू शकत नाहीत. त्यामुळे अन्नसाखळीचा पायाच कोलमडतो. हे शेतजमिनीतही घुसून ठाण मांडून बसत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलं आहे. गाजर गवतात पार्थेनिन, अँब्रोसिन अशी विषारी रसायनं असतात, जी परिसंस्थेतील इतर जीवांना हानिकारक ठरतात. कडधान्यांच्या मुळांमध्ये नत्र स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवणारे रायझोबियम, ऍझेटोबॅक्टर हे जिवाणू गाजरगवतामुळे मरतात आणि नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया थांबून जमीन नापीक होते. ज्या ज्या भागांमध्ये हे काँग्रेस गवत फोफावलं आहे, त्या त्या भागांत शेती उत्पादन लक्षणीय घटलं आहे. गजर गवताचे माणसाच्या आणि जनावरांच्या आरोग्यावरही भयंकर दुष्परिणाम आढळून आलेले आहेत. शेतातील गाजर गवत उपटून टाकताना त्याचे परागकण श्वसनावाटे शरीरात जाऊन अनेक शेतकऱ्यांना दमा, खोकला इत्यादी श्वसनविकार झाल्याचं आढळून आलं आहे. गाजर गवतातील विषारी रसायनांमुळे खाज उठणे, फोड येणे, जळजळ असे त्वचारोगदेखील होतात. गुरांनी गाजर गवत खाल्ल्यामुळे त्यातील विष दुधात उतरतं. गाजर गवत खाल्लेल्या प्राण्याचं मांस खाल्ल्यानेही माणसाच्या शरीरात त्यातली विषारी रसायनं जाऊन आजार निर्माण होतात. गाजर गवत खाल्ल्यामुळे जनावरांच्या तोंडाला इजा झाल्याचं तसंच जनावरांचा मृत्यू झाल्याचंही अनेक अभ्यासकांना आढळलं आहे. ‘काँग्रेस गवता’चे काही औषधी उपयोग असल्याचं काही शास्त्रज्ञ सांगतात. पण त्याचं उपद्रवमूल्यच जास्त आहे. या ‘काँग्रेस गवत’ नामक भुताचा नायनाट करायचा तरी कसा? शेतकऱ्यांसमोर, शास्त्रज्ञांसमोर आणि सरकारसमोर हे एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे. जिथे जिथे गाजर गवत दिसतं, तिथे तिथे ते तात्काळ उपटून जाळून टाकणे हा एक उपाय होऊ शकतो. पण कितीही उपटून टाकलं तरी, ते पुन्हा उगवतं आणि फोफावतंच. शिवाय ही पद्धत सुरक्षितही नाही. कारण, यामध्ये सतत गाजर गवताशी संपर्क आल्यामुळे आजार होण्याची शक्यता असते. काही रसायनांची फवारणी करून गाजर गवत नियंत्रणात येऊ शकतं. पण ही रसायनं परिसंस्थेतील इतर जीवांनाही हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे हाही पर्यावरणदृष्ट्या पूर्ण सुरक्षित उपाय नाही.

 

सध्यातरी उपलब्ध असलेला त्यातल्या त्यात परिणामकारक आणि सुरक्षित उपाय म्हणजे जैविक नियंत्रण (Biological Control). म्हणजे काय, तर गाजर गवत खाऊ शकणाऱ्या कीटकांची पैदास करायची आणि गाजर गवत वाढू न देणाऱ्या वनस्पतींची लागवड करायची. ‘झायगोग्रामा बायकोलोरॅटा पॅलिस्टर’ (Zygogramma bicolorata pallister) नामक गाजर गवत खाणारा एक किडा १९८२ साली मेक्सिकोमधून भारतात आणण्यात आला आणि इथे तो कितपत प्रभावी ठरतो त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी त्याची पैदास करून गाजर गवत असलेल्या ठिकाणी त्याला सोडण्यात आलं. हा किडा गाजर गवताची पानं खाऊन जगतो. या किड्यामुळे गाजर गवत बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. ‘एपिब्लेमा स्ट्रेनॉना’ (Epiblema strenauna), ‘लिस्ट्रोनोटस सेटोसिपेनिस’ (Listronotus setosipennis), ‘कार्मेन्टा’ (Carmenta ithacae) असे गाजर गवत खाणारे अन्य काही कीटक आहेत, ज्यांची पैदास करून गाजर गवत नियंत्रणात ठेवता येऊ शकतं. अर्थात, हे कीटक बेसुमार वाढून स्थानिक वनस्पती-प्राण्यांना हानिकारक ठरत नाहीत ना, याची सावधगिरी मात्र बाळगावी लागते. झायगोग्रामा किड्याच्या बाबतीत सुदैवाने अजूनतरी असं काही आढळलेलं नाही. कारण, तो फक्त गाजर गवतावरच जगू शकतो. भारतातील काही स्थानिक वनस्पतींच्या सहवासात गाजर गवत वाढत नाही, असं संशोधनांती आढळून आलं आहे. काटेमाठ (Amaranthus spinosus), टाकळा (Cassia tora), भू-तुळस (Ocimum basilicum) अशा काही वनस्पती ‘काँग्रेस गवता’ची वाढ रोखतात. झेंडूची झाडंही ‘गाजर गवता’ची वाढ रोखतात. शेतात अधूनमधून झेंडूच्या फुलांचं पीक घेतल्यास गाजर गवताला थोपवता येऊ शकतं. खरंतर यावर कुठलाही एक असा उपाय पुरेसा नाही. गाजर गवत उपटून टाकणे, ते खाणाऱ्या कीटकांची पैदास करणे आणि गाजर गवत वाढू न देणाऱ्या स्थानिक वनस्पतींची लागवड करणे असे सर्व उपाय संयुक्तपणे अवलंबावे लागतात, ज्याला Integrated Weed Management म्हणतात. अशा संयुक्त उपचारपद्धतीने ‘काँग्रेस गवत’ नियंत्रणात ठेवता येईल. याबाबत जनजागृती होण्याची आज गरज आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@