मुंबई : आसाममध्ये गोतस्करांविरोधात आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून या दरम्यान पोलिसांनी एकाच दिवशी एकूण १३३ जणांना अटक केली आहे. कारवाईदरम्यान त्यांनी एक टनापेक्षा अधिक संशयास्पद गोमांस जप्त केल्याची सुद्धा माहिती आहे. ही कारवाई आसाम गो संरक्षण कायदा, २०२१ अंतर्गत एका विशेष मोहिमेचा भाग होती.
राज्यातील गुवाहाटी, नागाव, चराईदेव, कोक्राझार, दक्षिण कामरूप आणि दिब्रुगड येथे मंगळवारी छापे टाकण्यात आले. संवेदनशील भागात प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल आणि गोमांसाची अनधिकृत विक्री रोखणे हे पोलिसांच्या मोहिमेचे उद्दिष्ट होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आले आणि तेथून गोमांस जप्त करण्यात आले. पोलिसांनी राज्यातील ११२ आस्थापनांवर छापे टाकले आणि बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्यांना ताब्यात घेतले. संबंधित प्रकरणाचा तपास सुरु असून सर्व व्यावसायिक अन्न प्रतिष्ठानांना कायद्याचे पालन करण्याचा कडक इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आसाममध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा आदर केला जाईल, परंतु कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे की ही मोहीम सुरूच राहील आणि कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.