बडगाम : जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे सुरक्षादलाला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या दहशतवाद्यांच्या खात्मा केल्यानंतर बडगाममधील संतप्त नागरिकांनी सुरक्षा दल आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर दगडफेक केली. ही दगडफेक करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुण सामील होते. या दगडफेकी दरम्यान सुरक्षादलापेक्षा माध्यम प्रतिनिधींना जास्त लक्ष करण्यात आले. एका वृत्तसंस्थेच्या ओबी व्हॅनवरदेखील मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. दहशतवाद्यांसोबत सुरक्षादलाच्या जवानांची चकमक सुरू असल्यास स्थानिक नागरिकांकडून सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली जाते. जवानांचे लक्ष हटवणे. तसेच दहशतवाद्यांना पसार होण्यास मदत करण्याचा हेतू ही दगडफेक करण्यामागे असतो. हे उघडकीस आले आहे.
बडगाम परिसरात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दहशतनवाद्यांना शोधून काढण्याची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलातील जवानांना चोख प्रत्युतर दिले. यादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलातील जवानांना यश आले.