भगवान ऋषभदेवांचा अहिंसेचा संदेश आजही अनुकरणीय : राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |

 

 
 
 
 
मांगीतुंगी : “शांतीच्या माध्यमातून अहिंसा आणि अहिंसेच्या माध्यमातून शांती, अशी शिकवण भगवान ऋषभदेव यांनी आपल्याला दिली आहे.” त्यांची ही शिकवण सामाजिक शांतीसाठी आजही उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. नाशिकमधील मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव यांच्या पवित्र भूमीवर आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 

याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, आ. राजेंद्र पाटणी, प्रज्ञाश्रामनी चंदनामती माताजी, ज्ञानमती माताजी, रवींद्र कीर्ती स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, “मी जेव्हा बिहार राज्याचा राज्यपाल होतो, तेव्हा तेथील अनेक जैनधर्मीय स्थळांना भेट देण्याचा योग आला. त्यामुळे मला अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. महाराष्ट्राच्या भूमीत शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रामदास स्वामी अशा कितीतरी महान व्यक्तींनी जन्म घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे. देशात नाशिक हे शहर कुंभमेळा आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.” त्यामुळे मांगीतुंगी येथील या समारंभामुळे नाशिकची ओळख वाढण्यास मदत होणार असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. यावेळी राष्ट्रपतींनी महाराष्ट्र राज्य सरकार लवकरच आपला चार वर्षांचा कालावधी पूर्ण करत असल्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

 

जैन धर्मातील अहिंसेच्या तत्त्वावर बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, “अहिंसा परमो धर्म’ हा जैन धर्माचा सिद्धांत उपयुक्त आहे. केवळ शारीरिक हिंसा न करणे म्हणजे अहिंसा नव्हे तर मन, वाचा याच्या माध्यमातूनदेखील कोणी दुखावले जाणार नाही याची शिकवण जैन समाज देत आहे. सम्यक ज्ञान, सम्यक आचरण याच्या माध्यमातून जैन धर्माने अहिंसेसाठी मोठे योगदान दिले आहे.” येथील ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीचा गौरवपूर्ण उल्लेख करताना राष्ट्रपती म्हणले की, “ऋषभदेव यांची उत्तुंग मूर्ती केवळ उंच आहे म्हणून मोठी आहे, असे नाही, तर त्या मूर्तीच्या माध्यमातून आपले आचरणदेखील तसेच उत्तुंग आणि करुणामय असावे, असा संदेश ऋषभदेव यांच्या मूर्तीतून मिळत आहे.”

 

वाढते प्रदूषण आणि निसर्गाची होणारी हानी याबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, “निसर्गाचे नुकसान होणार नाही असे वर्तन करणे म्हणजेदेखील अहिंसा आहे. आज वाढणार्या प्रदूषणात निसर्गाशी मैत्री करणे आवश्यक आहे आणि ही शिकवण जैन धर्म आपणास देतो. निसर्ग जपणे हे मानवी करुणेचे प्रतीक आहे.” या प्रसंगी त्यांनी महात्मा गांधी यांनीदेखील अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता, हे सांगून अहिंसेचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ऋषभदेव यांनी ज्या प्रकारे आदर्श शासन उभे केले तसेच कार्य आमच्या हातून घडो यासाठी मी त्यांचे आज आशीर्वाद मागत आहे. ऋषभदेव सर्व क्षेत्रांत ज्ञानी होते. त्यांनी आपल्या शिकवणुकीच्या माध्यमातून जगाला अहिंसा आणि करुणा याचा संदेश दिला. जेव्हा आपण त्यांची १०८ फुटी उंच मूर्ती पाहतो, तेव्हा अहिंसा व करुणा यांचा भाव मनात जागृत होतो. या मूर्तीच्या माध्यमातून आपण उत्तुंग विचार करण्यास शिकावयास हवे. आजमितीस आपण ज्या प्रश्नांचा सामना करत आहोत, त्यात अहिंसेचा मूलमंत्र हा अतिशय उपयुक्त आहे. मानवाने पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाशी खेळणे बंद करावयास हवे. निसर्गाला हानी न पोहोचविण्याची शिकवण आपल्या तीर्थंकारांनी दिली आहे.

 

मांगीतुंगी येथील विकासकार्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “येथे ३ महिन्यांत ५५ कोटींची कामे राज्य शासनाच्या माध्यमातून झाली आहेत आणि येथील नियोजित कामेदेखील लवकरच पूर्ण केली जाणार आहेत.” मुंबई येथील विश्वशांती भवन निर्मितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “भवनाचे काम अधिसूचना जारी करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचले आहे. तसेच, राज्यातील दुष्काळाबाबत बोलताना ते म्हणाले की, दुष्काळाचा सामना करण्यासाठी १७९ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचा जीआर लवकरच येणार आहे.” आमचे सरकार शेतकर्यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

सुभाष भामरे म्हणाले की, “या संमेलनाच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी मोठे योगदान दिले जात आहे. जैन धर्म बंधुत्वाची शिकवण देतो. आजमितीस जगाला अहिंसेची अत्यंत आवश्यकता आहे. शांती भंग होण्यात अहंपणा कारणीभूत असतो,” ज्ञानमती माताजी यांनी ऋषभदेव यांचा वैदिक ग्रंथातील उल्लेखांचा दाखला दिलातसेच, जैन धर्माचे तीर्थंकर असलेल्या ऋषभदेव यांचा अहिंसेचा व शांतीचा संदेश जगाला पोहोचावा यासाठी संमेलन आयोजित केल्याचे सांगितले. तसेच मूर्ती निर्माणामागील १९९६ ते २०१६ पर्यंतचा इतिहास त्यांनी विशद केला तसेच मांगीतुंगी भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून उदयास यावे यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@