
भीमा-कोरेगाव हिंसाचाराची झळ संपूर्ण महाराष्ट्र सोसत आहे, यामागे कोण असावे? असा प्रश्न देखील अनेकांना पडत आहे. काही कडव्या डाव्या संघटनांनी या संदर्भात आधीच इशारे दिल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मात्र यात जिग्नेश मेवाणी यांच्या भाषणाने देखील तेल ओतले आहे, असे दिसून येते.
भीमा-कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन केले गेले होते. तेथे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आपल्या भाषणात या हिंसाचारासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते, ते म्हणाले की, जनतेची लढाई लढणारे लोक विधानसभेत, संसदेत असावेत मात्र जाती निर्मूलन केवळ रस्त्यावरील लढाईनेच होईल. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग यांच्यातील दरी रस्त्यावरील लढाईनेच संपुष्टात येईल. त्यांच्या या वक्तव्याचा कोणता अर्थ होतो, असा सवाल समाज माध्यमांद्वारे विचारला जात आहे.
त्याचबरोबर ते म्हणाले होते की, जर देशात क्रांती घडवायची असेल तर विधानभवनात अथवा संसदेतून ती घडणार नाही, रस्त्यावर उतरूनच घडवावी लागेल, या रस्त्याच्या लढाईनेच नवपेशवाई संपेल. योगायोगने त्यांच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथील रस्त्यांवर दुर्दैवी दगड फेक सुरु झाली.
त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. सामान्य जनता यामुळे त्रस्त झाली असून, भीमा-कोरेगाव येथे आलेल्या हजारो भक्तांची गैरसोय झालेली संपूर्ण महाराष्ट्राने पहिली आहे. जिग्नेश मेवाणी यांनी असे चिथावणी खोर भाषण दिले नसते तर कदाचित महाराष्ट्रात जातीय तेढ माजली नसती, असे समाजमाध्यमांमध्ये बोलले जात आहे.