भारतीय रेल्वे बदलत आहे ...

    19-Feb-2017   
Total Views | 2
 
 
पुण्याहून कल्याणला जाण्यासाठी स्टेशनवरून भर दुपारी ३:२० ची इन्दोर एक्सप्रेस धावतपळत ३:१५ ला पकडली आणि आरक्षित केलेल्या जागेवर पोहोचलो. तिथे एक गरोदर महिला बसल्या होत्या. त्यांचे कोणी नातेवाईक त्यांना सोडोयला आले होते. माझी जागा खालच्या बर्थवर खिडकीजवळ होती. पण तिथे नेमक्या त्या बसल्या होत्या. त्यांची जागा तिसऱ्या बर्थवर होती.त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीनं मला विनंती केली की तुम्ही वर ॲडजस्ट कराल का? जेमतेम तीन तासांचा प्रवास होता आणि बाईही अवघडलेल्या वाटत होत्या म्हणून मी वर बसलो. आणि प्रवास सुरु झाला.
 
 
मी आल्यापासून बाजूच्या वरच्या बर्थवर बसलेला एकजण अस्वस्थपणे इकडे-तिकडे पाहात होता. आधी मला वाटलं की त्याचं कोणी यायचं राहिलंय. पण तसं नव्हतं. तो नुसताच अस्वस्थ होता. मी खरंतर पुस्तक वाचत होतो पण त्याच्या त्या अस्वस्थ होण्यानं माझं लक्ष सारखं त्याच्याकडे जात होतं. गाडीनं पिपंरी चिंचवड सोडल्यावर मग जरा त्याच्या जिवात जीव आला. आणि तो त्याच्या सीटवर झोपला. मलाही पुस्तक वाचता वाचता कधी झोप लागली कळलं नाही. 
 
 
लोणावळा आल्यावर एकदम वर्दळ सुरू झाली आणि मला जाग आली. लोक वडापाव, चहा, पाण्याच्या बाटल्या असं काहीबाही घेत होती. मी ही उठून बसलो. घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा पुस्तक वाचत बसलो. सहसा दुपारी टि.सी. येत नाही त्यामुळे दुपारी बऱ्याचवेळा आरक्षणाच्या डब्यातही साधं तिकिट काढलेले प्रवासी येऊन बसतात. नेमका आज एक टि.सी. डब्यामध्ये आला आणि मगाशी अस्वस्थ असलेला तो समोरचा प्रवासी अजूनच अस्वस्थ झाला. माझ्या लक्षात आलं की बहुदा त्याच्याकडे तिकिट नसावं म्हणून तो असावा. आणि झालंही तसंच. टि.सीं.नं तिकिट विचारलं तेव्हा याने साधं तिकिट दाखवलं. त्यावर हे चालणार नाही असं म्हणत त्याने त्याला तिथेच थांबायला सांगितलं. आमची सगळ्यांची तिकिटं तपासून झाल्यावर तो पुन्हा त्याच्याकडे गेला.
 

सामान्यपणे असा प्रसंग घडला की टि.सी. अशा प्रवाशाला बाजूला बोलवून घेतात. कोणाचं लक्ष नाही असं बघून त्याच्याकडून ४०-५० रुपये घेतात आणि त्याला त्या जागेवर बसू देतात असा माझा आजवरचा अनुभव. एकदा तर एक टि.सी. चक्क माझ्या शेजारीच येऊन बसला होता आणि सगळ्यांचं सगळं 'मिटवत' होता. अर्थात नेहमीच अशी वाईट उदाहरणं होती असं नव्हे, काही चांगली उदाहरणंही होतीच. पण ती व्यक्तीच प्रामाणिक असल्यामुळे तसा अनुभव आला असल्याची शक्यता अधिक आहे. पण यावेळी मात्र उलटंच घडलं. टि.सी. त्याच्या जवळ जाताच तो माणूस त्याला तिकिटाआडून पैसे देऊ लागला. मी पुढच्या सगळा घटनाक्रम इतका दिग्मूढ होऊन पाहात होतो की माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आणि डोळ्यांपेक्षाही कानांवर जास्त. टि.सी.नं ते पैसै घ्यायला नकार दिला आणि म्हणाला, "तुम्ही तर चांगले कपडे घातलेले दिसता. जेंटलमन वाटले मला. मग तुम्ही हे काय करताय?". यावर तो तरूण ओशाळला आणि म्हणाला, "राहूदे ना साहेब. घ्या". त्यावर साहेबानं जे उत्तर दिलं ते ऐकून मी अवाकच झालो. "कशाला असं करता रे. इतकं चांगलं सरकार आहे. रेल्वेसाठी इतकं चांगलं करून राहिले. मग तुम्ही का पैसे नाही भरत? डिफरन्स भरून टाक आणि पावती घे", असं म्हणून तो चक्क पावती करायला खाली बसला. बोलण्यावरून तरी हा टि.सी. बहुदा वऱ्हाडातला असावा असं वाटत होतं. तो माणूस पुन्हा तेच म्हणणार इतक्यात टि.सी.नं त्याला खाली बोलवलं. मग वरच्या बर्थवरून हा माणूस खाली आला आणि पुन्हा गयावया करायला लागला. "अरे तू इतका वेळ बसलास ना. इतक्या चांगल्या सीटचा उपभोग घेतलास ना? मग १०० रुपये भरायला काय त्रास आहे तुला?" अशी समजूत काढली टि.सी.नं. त्यावर "साहेब कायम अपडाऊन करणारा आहे मी" असं त्या माणसानं म्हणताच, "कायम अपडाऊन करणाऱ्यानं कुठेही बसावं असा नियम आहे का रे?" असं म्हणत त्याच्या हातात पावतीच थोपवली. त्या माणसाचा नाईलाज झाला आणि त्यानं १०० रुपये काढून दिले. "असं करत नका जाऊ रे. मी आज सकाळपासून एक आख्खं पावतीपुस्तक संपवलं. सगळे लोक दंड भरून राहिले नं. मग? परत असं करू नका हा" असं म्हणत तो निघूनही गेला.
 
 
खरंतर हा खूप साधा प्रसंग. रेल्वेनं कायम प्रवास करणाऱ्या कोणाही प्रवाशानं अनेकवेळा अनुभवलेला. पण यात वेगळेपणा हा होता की रेल्वेच्या कर्मचाऱ्याला स्वत:हून रेल्वेसाठी चांगलं काम करावसं वाटत होतं कारण त्याला सरकारच्या प्रयत्नांचं खूप कौतुक आणि अप्रुप वाटत होतं. अनेकवेळा आपण नोकरशाहीला नावं ठेवत असतो. पण तीही शेवटी माणसंच असतात ना. जर एखादं सरकार चांगलं काम करत असेल तर मग हीच नोकरशाही अशी सकारात्मक प्रतिसादही देते. माणसं सगळीकडे चांगली आहेत, गरज आहे त्यांच्यातल्या चांगुलपणाला आपल्यातल्या चांगुलपणाने साद घालण्याची. अर्थात यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आणि नोकरशाही विधायक कामासाठी राबवण्याची धमकही. नेमकी तीच धमक आज सरकारच्या इतर खात्यांसारखीच रेल्वेतही दिसत आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की भारतीय रेल्वे बदलत आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अर्थात हा उत्साह आणि विश्वास कायम ठेवणं हेच यातील सर्वात मोठं आव्हान आहे. सध्याचं सरकार आणि त्यांचे मंत्री हे किती काळ टिकवू शकतील हे येणारा काळच सांगेल.
 
अग्रलेख
जरुर वाचा
मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121