’नमस्कार डॉक्टर.’
’नमस्कार. बोला.’
’डॉक्टर, जनकल्याण रक्तपेढी आपल्या रुग्णालयात एक प्रशिक्षण वर्ग घेऊ इच्छिते. त्याबाबतच बोलण्यासाठी मी आलो होतो.’ पुण्यातील एका रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांशी आधी ठरवून झालेल्या भेटीत माझा संवाद सुरु होता.
’प्रशिक्षण वर्ग ? कशाबद्दल ? आणि कधी ? किती वेळ ?’ डॉक्टरांनी दोन-तीन प्रश्न एका दमात विचारले.
’रुग्णालयातील परिचारिका आणि निवासी डॉक्टरांसाठी ’सुरक्षित रक्तसंक्रमण’ हा विषय मध्यवर्ती ठेवून आम्ही एक प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. जास्तीत जास्त एक ते दीड तास हा कार्यक्रम चालेल. रक्तपेढीचे डॉक्टरच हे प्रशिक्षण देतील. तो कधी घ्यायचा हे आपणच सांगा.’ मी स्पष्टीकरण दिलं.
’व्वा. कल्पना तर छानच आहे.’ डॉक्टरांनी आपली बाजू मांडली. ’पण दोन अडचणी वाटतात. एक तर सर्वच जणांना या प्रशिक्षणात सहभागी करणं जरा कठीण आहे. दुसरं म्हणजे प्रेजेंटेशनसाठी लागणारा सेट-अप आमच्याकडे उपलब्ध नाही.’
’काहीच हरकत नाही सर. सर्वांचे प्रशिक्षण होण्यासाठी हा कार्यक्रम आपण दोन किंवा तीन बॅचेसमध्ये घेऊ आणि प्रोजेक्टर वगैरेची काळजी करु नका, ते सर्व आम्ही सोबत घेऊन येऊ.’ मी हे पर्याय दिल्यानंतर मात्र या डॉक्टर महोदयांनी त्वरित तारखा ठरविल्या आणि यथावकाश एक चांगला प्रशिक्षण वर्ग त्यांच्या रुग्णालयात पार पडला.
अशा प्रकारच्या रुग्णालय भेटी शेकडो वेळा झाल्या. रुग्णालयांत ’सुरक्षित रक्तसंक्रमण’ या विषयाचे प्रशिक्षण व्हावे हेच या भेटींचे मुख्य सूत्र असे. हा उपक्रम सुरु व्हायला एक साधंच निमित्त घडलं. मला तो दिवस अजूनही चांगला आठवतो, जेव्हा जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी एका बैठकीत आपला हात आत्मविश्वासपूर्वक उंचावत ’आपण हे करुच, नव्हे आपल्याला हे करायचंच आहे’ असं विधान ठामपणे केलं होतं. हे उद्गार त्यांनी रुग्णालयांतून घेण्याच्या अशा प्रशिक्षणाबाबत काढले होते. त्या वेळेपर्यंत म्हणजे २०१२ सालापर्यंत पुण्यातील विविध रुग्णालयांतील प्रतिनिधींना रक्तपेढीमध्ये एकत्र बोलावुन ’सुरक्षित रक्तसंक्रमण’ या विषयावर त्यांचा वर्षातून किमान एक प्रशिक्षण वर्ग घेण्याचा पायंडा जनकल्याण’ने रूढ केलेला होता. हे रुग्णालय-प्रतिनिधी म्हणजे रुग्णालयातील परिचारिका आणि निवासी वैद्यकीय अधिकारी हे असत, ज्यांचा रुग्णाला प्रत्यक्ष रक्तसंक्रमण देण्याशी संबंध असतो. वर उल्लेख केलेल्या बैठकीच्या नुकताच आधी असा एक प्रशिक्षण वर्ग पार पडला होता. या वर्गानंतर झालेली ही आढावा बैठक होती. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे लाभ तर चर्चेत आलेच पण त्याबरोबरच अनेक रुग्णालयांसाठी एका ठिकाणी असे प्रशिक्षण घेण्यातील मर्यादांचाही मोठ्या प्रमाणावर उहापोह या बैठकीत झाला. विशेषत: प्रत्येक रुग्णालयातून एक किंवा दोन प्रतिनिधी या वर्गासाठी येणार, त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष रुग्णालयात या आवश्यक विषयाचे प्रसारण कसे आणि किती होणार, याखेरीज पुढचा प्रशिक्षण वर्ग घेताना मागील वेळी आलेले प्रतिनिधीच पुन्हा येतील असे नाही किंवा मागे आलेल्या प्रतिनिधींनी कदाचित नोकरीही बदलली असेल - अशा अडचणींमधून सुरक्षित रक्तसंक्रमणाचा हेतू कसा साध्य होणार या आणि अशा प्रकारच्या मर्यादा या चर्चेतून पुढे आल्या. यावर अचानकपणे ’आपण असा प्रशिक्षण वर्ग थेट एकेका रुग्णालयातच जाऊन घेतला तर ?’ असा एक वेगळाच विचार डॉ. कुलकर्णी यांनी सर्वांपुढे ठेवला आणि एकदम चर्चेची दिशा बदलली. विचार निश्चितच अभिनव होता. पण यातही बऱ्याच अडचणी दिसत होत्या. वर्षातून एखादा प्रशिक्षण कार्यक्रम घेणे आणि सर्वच रुग्णालयांत सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेत रहाणे यात पुष्कळच फ़रक होता. हे प्रशिक्षण पूर्णत: तांत्रिक स्वरुपाचे असल्याने प्रत्येक वेळी कुठल्या तरी डॉक्टरांनाच वक्ता म्हणून जावे लागणार, हे तर उघडच होते. त्यात जवळपास रोज चालणारी रक्तदान-शिबिरे, रक्तपेढीमध्ये दिवस आणि रात्रपाळीतील भरपूर कामे पार पाडत डॉक्टर लोक या प्रशिक्षणासाठी वेळ कसा काढतील, याबाबत सर्वांच्या मनात जरा साशंकताच होती. त्यामुळे ’हे आपल्याला जमेल का’ असा सूर जेव्हा या बैठकीचा झाला तेव्हा डॉ. कुलकर्णी यांनी ’आपण हे करुच’ असे अत्यंत ठामपणे सर्वांना सांगितले आणि मग मात्र ’हे कसे कसे करु या’ अशा सकारात्मक वळणावर ही चर्चा आली. एका अभिनव अशा उपक्रमाचा हा आरंभबिंदु होता.
रक्तदान शिबिरांमधून अथवा रक्तपेढीमध्ये होणाऱ्या रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलित करणे, रक्तपेढीमध्ये त्या रक्तावर आवश्यक त्या तपासण्या करून त्याची सुरक्षितता पडताळणे, त्या रक्तापासून रक्तघटक तयार करणे, योग्य त्या तापमानाला त्यांची साठवणूक करणे आणि हे सर्व रक्तघटक मागणीप्रमाणे व त्यांच्या आयुर्मानाप्रमाणे वितरित करणे हे सामान्यत: कुठल्याही रक्तपेढीचे ठरलेले काम आहे. त्यामुळे ही सर्व कामे अचूक करण्याबरोबरच कागदोपत्री लेखाजोखा व्यवस्थित ठेवणे हे कुठल्याही रक्तपेढीसाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असते. आव्हानात्मक अशा अर्थाने की, यातील छोट्याशा चूकीचा परिणामही रुग्णाच्या जीवन सुरक्षेवरच होऊ शकतो. परंतू केवळ रक्तपेढीने आपले काम व्यवस्थित करून सुरक्षित रक्त संक्रमण साध्य होईल असे नाही तर यासंदर्भात प्रत्यक्ष रक्तसंक्रमण देणा-या रुग्णालयातील परिचारिका वर्ग आणि डॉक्टर्स यांचीही भूमिका तितकीच किंबहुना अधिक महत्वाची आहे. मात्र रक्तपेढीतील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी रक्ताची सुरक्षा हे जसे एकमेव उद्दीष्ट असते तसे रुग्णालयातील परिचारिका वर्ग आणि डॉक्टर्स यांच्यासाठी मात्र रक्तसंक्रमण हे त्यांच्या अनेक कामांपैकी एक काम असते. त्यामुळे रक्तसंक्रमण या महत्वाच्या विषयातील अद्ययावत ज्ञान या सर्वांपर्यंत पोहोचणे ही एक निकडीची बाब असली तरी दुर्दैवाने ती जराशी दुर्लक्षितही आहे.
या सर्व गोष्टींचा विचार जनकल्याण रक्तपेढीने केला आणि रुग्णालयातील रक्तसंक्रमणाचे काम प्रत्यक्षपणे करणारा परिचारिका वर्ग आणि डॉक्टर्स यांच्यासाठी ‘Aiming Towards Safe Blood Transfusion’ (लक्ष्य सुरक्षित रक्तसंक्रमणाचे) या अभिनव प्रशिक्षण वर्गाची आखणी केली. पूर्वी होणाऱ्या सर्व रुग्णालयांच्या एकत्रित प्रशिक्षण वर्गापेक्षा थोडे वेगळे स्वरुप या नवीन उपक्रमाला दिले गेले. रुग्णालयातील कार्यव्यस्तता लक्षात घेवून फ़क्त एक ते दीड तासांमध्ये घेता येतील अशी रक्तसंक्रमणाशी संबंधित सर्व अद्ययावत ज्ञानाने युक्त पूर्णत: तांत्रिक विषयांतील दोन सादरीकरणे (presentations) डॉ. अतुल कुलकर्णी यांनी डॉक्टरांच्या टीमसोबत बसून तयार केली. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या सर्वांना देण्यासाठी एक आकर्षक प्रमाणपत्रही तयार केले गेले. हा प्रशिक्षण वर्ग घेण्याबद्दल विनंती करणारे पत्र रुग्णालय प्रशासनासाठी तयार केले गेले. अशा प्रकारचे प्रशिक्षण हे आपले एक सामाजिक उत्तरदायित्व असल्याचे मानून असे कार्यक्रम पूर्णत: अव्यावसायिक अर्थात नि:शुल्क होतील हेही ठरले. इतकेच नव्हे तर काही रुग्णालयांमध्ये या सादरीकरणांसाठी लागणारा प्रक्षेपक संच (LCD projector set) नसेल हे लक्षात घेऊन असा एक संचही रक्तपेढीने तातडीने खरेदी केला.
या सर्व तयारीनिशी जेव्हा रुग्णालय संपर्क सुरु झाला तेव्हा अपेक्षेप्रमाणेच या योजनेचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत झाले. रक्तसंक्रमण क्षेत्रातील अद्ययावततेसाठी जनकल्याण रक्तपेढीचा सक्रीय पुढाकार अनेक रुग्णालयांना मनापासून भावला. प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गाची सुरुवात हडपसरमधील इनामदार हॉस्पिटलपासून झाली. त्यानंतर अनेक रुग्णालयांमध्ये हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. तांत्रिक सत्रे, त्यासंबंधीची प्रश्नोत्तरे आणि शेवटी प्रमाण पत्रांचे वितरण असा हा छोटेखानी कार्यक्रम रुग्णालयांतील परिचारिका वर्ग व डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकारी या सर्वांनीच वाखाणला आणि त्याविषयीच्या लेखी प्रतिक्रियाही दिल्या.
या वर्गासाठी वक्ते म्हणून सुरुवातीला स्वत: डॉ. कुलकर्णी हेच येत असत. नंतर रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी बर्वे यांनी ही धुरा सांभाळली. या दोघांसह अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमांचा समन्वयक म्हणून माझेही जाणे झाले. रक्तघटकांची निर्मिती कशी होते, ते कसे साठवले आणि हाताळले जातात, रक्तघटक मागणीचा फ़ॉर्म कसा भरायचा, कोणती माहिती अनिवार्य आहे, रक्तपिशवी हातात आल्यानंतर ती तपासायची कशी, प्रत्यक्ष रुग्णाला रक्त भरताना काय काळजी घ्यायची, निरीक्षण कसे करायचे, नोंद कशा-कशाची ठेवायची, रुग्णाला त्रास झाला तर त्या परिस्थितीत काय करायचे इ. अगदी ’प्रॅक्टिकल’ गोष्टींचा अंतर्भाव या सादरीकरणांमध्ये असतो. शिवाय विषय कितीही क्लिष्ट असला तरी तो अगदी सुलभ करुन सांगण्याची एक विलक्षण हातोटी या दोन्ही डॉक्टरांकडे आहे. याचा उपयोग रुग्णालयांना तर झालाच पण मलाही कितीतरी गोष्टी यामुळे समजत गेल्या. डॉ. बर्वे यांना मी एकदा गमतीने म्हणालोसुद्धा की, आता एखाद्या नवीन ठिकाणी मीदेखील डॉक्टर म्हणून असे प्रशिक्षण घेऊ शकतो एवढे ज्ञान आता माझ्याकडे साठले आहे.’ हा उपक्रम सुरु झाल्यानंतर असे शंभरेक कार्यक्रम आजवर पार पडले आहेत. अगदी दहा खाटांच्या छोट्या रुग्णालयापासून ते दोनशे खाटांच्या मोठ्या रुग्णालयांपर्यंत हे प्रशिक्षण वर्ग पोहोचले आहेत. शिवाय पुण्याच्या आजुबाजुच्या परिसरातील फ़लटण, शिरवळ, सासवड, शिरूर अशा ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्येदेखील असे प्रशिक्षण जनकल्याण’ने घेतले आहे.
रक्तसंक्रमण या विषयावर संवाद करण्यासाठी, शंकानिरसनासाठी रुग्णालयांना एक हक्काचे व्यासपीठ या निमित्ताने मिळाले. ’हे तर आम्हाला माहितीच नव्हतं’ किंवा ’आज खूपच नवीन गोष्टी समजल्या’ यांसारख्या नित्याच्या प्रतिक्रियांनी ’आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत’ हे आमच्या लक्षात आणून दिलं. त्यामुळेच हा उपक्रम अविरतपणे चालु ठेवण्याचा निर्धार रक्तपेढीने केलेला आहे. ’आपण हे करुच’ हे वाक्य या उपक्रमाचा ट्रिगर ठरलं, इतकंच नव्हे तर नंतरही अनेक मोठी कामे हाती घेताना हाच आत्मविश्वास उपयोगी पडला. ’हे आपल्याला जमेल का’ ते ’आपण हे करुच’ पर्यंतचा प्रवास आता ’आपण हे करत राहणार’ इथवर आलेला आहे.
’सुरक्षित रक्तसंक्रमणावरील हे प्रशिक्षण’ म्हणजे रक्तपेढीने चालु केलेला हा एक ज्ञानयज्ञ आहे आणि प्रशिक्षित झालेल्या परिचारिका आणि डॉक्टरांमुळे लाभान्वित झालेले रुग्ण म्हणजे या यज्ञाचे सार्थक आहे.
- महेंद्र वाघ