
ग्वाल्हेर : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उल्हास कशाळकर यांना नुकताच भारतीय शास्त्रीय संगीत विश्वात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय तानसेन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्वाल्हेर येथे संगीत सम्राट तानसेनाच्या समाधिजवळ सुरु असलेल्या तानसेन संगीत समारोहात त्यांना हा पुरस्कार मध्य प्रदेशच्या नगरविकास मंत्री माया सिंह व उच्च शिक्षण मंत्री जयभान सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ग्वाल्हेर ही ख्याल गायनाची गंगोत्री आहे. ग्वाल्हेरशी आमचे अतूट नाते आहे. त्यामुळे मला संगीत सम्राट तानसेन यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला याबद्दल अतिशय आनंद होत असे अशा शब्दात पं. कशाळकर यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. शास्त्रीय संगीत व कला जोपासण्यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून केला जाणारा हा प्रयत्न निश्चितच उत्साहवर्धक आहे, प्रशंसनीय आहे असेही कशाळकर यावेळी म्हणाले. पं. उल्हास कशाळकर यांना गायन क्षेत्रातील दीर्घ साधन, कल्पकता व घराणेदार गायन परंपरा जोपासण्याबद्दल २०१७ – १८ या वर्षासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.