आपले रोजचे जगणे ज्याच्याशिवाय अवघड झालेले आहे, तो म्हणजे आपला मोबाईल फोन. त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना करणे खरंच खूप अवघड होऊन बसले आहे. यात आज स्मार्ट फोनचे युग! अॅन्ड्रॉईड प्रणालीने यात विलक्षण क्रांती घडविली आहे. त्यामुळे स्मार्टफोन सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकला आहे.
अश्या या अॅन्ड्रॉईडच्या अनेक गमती-जमती आहेत ज्याबद्दल अनेकांना खूप कमी माहिती असते. जसे की, अॅन्ड्रॉईडच्या प्रत्येक व्हर्जनला डेझर्टचे नाव का दिले जाते? त्याचा लोगोच्या मागे नेमके काय गमक आहे? अॅन्ड्रॉईड आणि रोबोटचा काही संबंध आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात आपल्याला मिळतील. त्याचबरोबर ज्या अॅन्ड्रॉईडनी आपल्या जीवन-पद्धतीत अमूलाग्र बदल केले आहेत, त्याच्याविषयी या गोष्टी वाचून नक्कीच तुम्हाला अचंबित व्हायला होईल...
अॅन्ड्रॉईड गुगलचे संशोधन ?
आज गुगल आणि अॅन्ड्रॉईड हे समानार्थी शब्द बनले आहेत. अनेक वेळेला आपण ऐकत असतो की, अॅन्ड्रॉईड तंत्रज्ञान गुगलद्वारे विकसित केले गेले आहे. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हे चुकीचे आहे. २००३ साली ४ तरुणांनी मिळून “अॅन्ड्रॉईड” ही ऑपरेटींग सिस्टीम विकसित केली. त्याचे महत्व ओळखून २००५ साली गुगलने ५० दशलक्ष डॉलरला ही अॅन्ड्रॉईड प्रणाली विकत घेतली.
नाव आणि लोगोचे गमक -
अॅन्डी रुबिन, रिच मिनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट या चार तरुणांनी अॅन्ड्रॉईड विकसित केली. त्यातील अॅन्डी रुबिनच्या नावाला अनुसरून याचे नाव अॅन्ड्रॉईड असे देण्यात आले. अनेकदा असा प्रश्न पडतो की, अॅन्ड्रॉईड आणि रोबोटचा संबंध काय ? खरंतर अॅन्डी रुबिन आणि त्याची टीम रोबोटिक्समध्ये काम करणारी टीम होती. त्याचबरोबर अॅन्ड्रॉईड शब्दाचा अर्थ पुरुष रोबोट असा होतो, त्यामुळे या प्रणालीला रोबोटचा लोगो दिला गेला. नासाद्वारे एक रोबोट अंतराळात सोडला गेला आहे, जो अॅन्ड्रॉई प्रणालीच्या आधारावर कार्यरत आहे.
अॅन्ड्रॉईड व्हर्जन्स -
अॅन्ड्रॉईड व्हर्जन्सबद्दल जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केले असेल, तर या सर्वांची नावं ही डेझर्टची नावं आहेत. त्याचबरोबर सर्व व्हर्जन्सची नावं इंग्रजी अल्फाबेटिक रचनेत आहेत. उदा. J - जेलीबीन, K - कीटकॅट, L - लॉलीपॉप इत्यादी.
याला अपवाद केवळ पहिले दोन व्हर्जन्स आहेत. ज्याला कुठल्याही डेझर्ट अथवा मिठाईचे नाव देण्यात आले नव्हते. C (सी) पासून सुरु होणारे हे अल्फाबेट आज N (एन) पर्यंत कार्यरत आहेत. या सर्वांची नावं खालीलप्रमाणे -
C - कपकेक
D - डोनट
E - इक्लेअर
F - फ्रोयो
G - जिंजरब्रेड
H - हनीकॉम्ब
I - आईसक्रिम सँडविच
J - जेलीबीन
K - कीटकॅट
L - लॉलीपॉप
M - मार्शमेलो
N - नॉगट
पुढील व्हर्जनचे नाव ओरिओ असेल अशी चर्चा सध्या आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा आत्तापर्यंत केली गेलेली नाही.
इतर माहितीपूर्ण -
अॅन्ड्रॉईड हे ओपन सोर्स तंत्रज्ञान असल्यामुळे यात अनेक लोक आपले स्वत:चे संशोधन करून भर घालू शकतात. ओपन हँडसेट अलायन्स नावाच्या संस्थेत नोंदणी करून आपण अॅन्ड्रॉईड ओपन सोर्स तंत्रज्ञानावर काम करू शकतो.
सुरुवातीला अॅन्ड्रॉईड उपकरणांना खूप प्रसिद्धी मिळाली नव्हती. एच टी सी कंपनीने २००८ साली अॅन्ड्रॉईड फोन बाजारपेठेत आणला मात्र मायक्रोसॉफ्ट आणि ब्लॅक-बेरी सारखे मोठे उद्योजक स्मार्ट फोन जगतावर अधिपत्य गाजवत होते. अशा काळात अॅन्ड्रॉईडबद्दल अनेक टीकाकार उभे राहिले होते. मात्र आपल्या युझर फ्रेंडली फीचर्समुळे अॅन्ड्रॉईडने आज बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज जवळपास ८८% मोबाईल फोन युझर्स अॅन्ड्रॉईडचा वापर करतात.
याबद्दल अनेक माहिती आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध आहे. मात्र, मराठी वाचकांना ही माहिती सहज आणि सोप्या भाषेत उपलब्ध व्हावी म्हणून हा एक प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाशी निगडित अश्या वेगळ्या आणि हटके विषयावर Tech भारत सदरातून आम्ही तुम्हाला भेटत असतो. तरी, अवश्य वाचा Tech भारत आणि तंत्रज्ञानात अपडेट राहा.
- हर्षल कंसारा