मुंबई : आपल्याला देश, धर्म, समाज आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आत्मजागरूकतेच्या आधारे विचार आणि चिंतन करून काम करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री (सीताक्का) यांनी केले. समितिच्या अखिल भारतीय कार्यकारिणी एवं प्रतिनिधि मंडलाची तीन दिवसीय अर्धवार्षिक बैठक स्मृती मंदिर, नागपूर येथे संपन्न होत आहे. प्रमुख संचालिका माननीय शांताक्का देखील बैठकीला उपस्थित आहेत.
दि. १८ जुलै पासून सुरू झालेल्या बैठकीत ३८ प्रांतांमधील सुमारे ५०० सेविका सहभागी होत आहेत. बैठकीच्या उद्घाटन सत्रात, मुख्य कार्यवाहिका सीताक्का यांनी समितिच्या कार्याचा अहवाल सादर केला आणि शिक्षा वर्गाचा आढावाही घेतला. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार १७९९ ठिकाणी महिलांसाठी सेवाकार्य सुरू आहे. सेवाकार्यात संस्कार वर्ग आणि स्वावलंबन, आरोग्य आणि योग केंद्रे चालवली जातात. दुर्गम भागातील मुलींसाठी वसतिगृहे चालवली जात आहेत. २०२५ मध्ये, समितीने देशभरात विविध ठिकाणी एकूण २२४ शिक्षा वर्ग आयोजित केले होते, ज्यात सुमारे १५,२७३ सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले.
लोकमाता पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गेल्या वर्षीपासून आतापर्यंत ४३९२ ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात सुमारे १ लाख ५१ हजार ५१९ नागरिकांनी सहभाग घेतला होता. महेश्वरमध्ये "शिवसंकल्प स्वरनाद" या विशेष भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.