मुंबई : केरळच्या आदिशंकर निलयम, कालडी येथे शिक्षा संस्कृती उत्थान न्यासच्या राष्ट्रीय चिंतन बैठकीचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थिती संपन्न झाले. या प्रसंगी चिन्मय मिशनचे स्वामी विवित्तानंद, न्यासच्या अध्यक्षा डॉ. पंकज मित्तल, संयोजक ए. विनोद आणि चिन्मय मिशनचे सुदर्शन आदी मान्यवर उपस्थिती होते.
उद्घाटन सत्रात शिक्षासंस्कृती उत्थान न्यासचे सचिव डॉ. अतुल कोठारी म्हणाले की, शिक्षणात भौतिकता आणि आध्यात्मिकतेचा समन्वय आवश्यक आहे. न्यासाचे कार्य आणि देशातील शिक्षणव्यवस्थेत होणारा बदल हे वेगळे नाहीत. आपल्याला समस्येवर चर्चा न करता उपायांवर चर्चा करायची आहे. समस्या ओळखून त्यावर उपाय कसा करता येईल, याचा विचार करायचा आहे. येथे न्यासाच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यात्मक आणि संघटनात्मक आढावा घेतला जाईल व भविष्यासाठी नियोजन केले जाईल.
त्यांनी पुढे नमूद केले की, केवळ एखादी संस्था, संघटना किंवा मंच एकटे राहून देशातील शिक्षणात बदल घडवू शकत नाही; सर्वांनी एकत्रितपणे एकाच दिशेने काम करणे आवश्यक आहे. न्यासाची स्थापना ही भारतीय शिक्षणाला एक नवीन पर्याय देण्यासाठी झाली असून हे कार्य इतके व्यापक आहे की केवळ ज्ञानोत्सव, ज्ञानकुंभ व ज्ञानसभा यांच्यापुरते मर्यादित राहून चालणार नाही, तर सातत्याने प्रयत्न करत राहावे लागेल.
चिन्मय मिशनच्या केरळ विभागाचे प्रमुख आचार्य विवित्तानंद म्हणाले की, भारताच्या शिक्षणात मूलभूत बदल घडवण्यासाठीच्या या चिंतन बैठकीचे आयोजन कालडी येथे होणे, हे आमचे सौभाग्य आहे. आपली भारतीय ज्ञानपरंपरा हीच आपली एकतेची मूळ आहे.
उद्घाटन सत्रात न्यासाच्या अध्यक्षा डॉ. मित्तल म्हणाल्या की, न्यासाने सुरुवातीपासूनच भारतीय ज्ञानपरंपरेच्या आधारे आधुनिक गरजांचा विचार करून शिक्षणासाठी एक नवीन पर्याय तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून भारतीय शिक्षणाचा पुनरुत्थान घडेल. भारतात शिक्षणाचा हेतू केवळ रोजगार मिळवणे नव्हता, तर माणसाला 'पूर्ण मानव' बनवण्याचे ते माध्यम होते. आपल्याला शिक्षण या दिशेने घेऊन जायचे आहे.
शिक्षा संस्कृती उत्थान न्यास गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात राष्ट्रहिताचे कार्य करून भारताच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. न्यासाचे मत आहे की शिक्षणातील मूलभूत बदल समाजाची जबाबदारी आहे. यासाठी समाज आणि सरकार यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. यामध्ये प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांची प्रमुख भूमिका आहे. तेव्हाच शिक्षणात खरा बदल घडू शकतो. हे प्रयत्न देशव्यापी अभियान आणि आंदोलन बनवण्याच्या दृष्टीने केले जात आहेत. शिक्षण हा देशाच्या प्राधान्यक्रमातील विषय व्हावा, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.