मुंबई : आरे कॉलनी मयूर नगर येथील ३० वर्ष जुन्या व नादुरुस्त अवस्थेत असलेल्या तसेच पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील ११ इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, त्याचबरोबर आदर्श नगर येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी ३ सी नुसार कार्यवाही सुरु करण्याच्या सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार रविंद्र वायकर यांच्या समवेत पार पडलेल्या संयुक्त बैठकीत एसआरएला देण्यात आल्या आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सोमवार,दि.१४ जुलै २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आरे कॉलनी या भागात मे. रॉयल पाम येथे बहुमजली इमारत बांधकाम होत असताना मे. वाडिया ट्रस्टकडून २४० एकर जमीन ही विकासक आमीर पार्क नेन्सी यांनी विकसित करण्यासाठी घेतली. या भूखंडावर पूर्वीपासून मयूर नगर, मोराचा पाडा, जीवाचा पाडा (१व२), चरणदेव पाडा व मरोशी पाडा अशा पाड्यांमधून एकूण ७५१ झोपड्यांचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी मार्फत करण्यात आले. ७५१ झोपड्यांचे परिशीष्ट-२ मध्ये रुपांतर करण्यात आले. मात्र त्यापैकी ११७ झोपड्यांचे पुनर्वसन पुनर्वसित इमारतीमध्ये करण्यात आले. उर्वरित ६३४ झोपड्यांपैकी बऱ्याचशा झोपडीधारकांचे नाव परिशीष्ट-२ मध्ये असूनही पुनर्वसन इमारतीमध्ये घरे देण्यात आली नाहीत. पुनर्वसित न झालेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसन व्हावे म्हणून विकासकाने अजून काही इमारतींचे बांधकाम केले. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या १२ इमारतीमधून झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित १० इमारतीपैकी ३ इमारती या कोर्टाच्या कचाट्यात आहेत व ७ इमारती अशाच बांधून नादुरुस्त अवस्थेत आहेत.
या पुनर्वसित इमारती या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बांधण्यात आल्या. या इमारती बांधण्यासाठी वापरण्यात आलेले बांधकाम साहित्य हि दर्जाहीन वापरण्यात आल्याने काही वर्षातच इमारतींच्या भिंतीना तडे गेले, जोगोजागी लीकेजेस, मुलभूत सोई-सुविधांचा अभाव आहे. सद्यस्थितीत येथील इमारती अति धोकादायक अवस्थेत असून कधीही अप्रिय घटना घडू शकते. तत्पूर्वी येथील रहिवाशी यांना स्थलांतरीत करावे तसेच या एसआरए इमारतींचा पुनश्च एसआरए मार्फत पुनर्विकास करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार वायकर यांनी बैठकीत केली.
त्यानुसार मयूर नगर एसआरएच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना देतानाच, हा धोरणात्मक निर्णय असल्याने मुंबईत अशा प्रकारच्या किती इमारती आहेत याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणून यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचप्रमाणे आरे कॉलनी आदर्शनगर येथील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ३ सी नुसार कार्यवाही सुरु करावी, अशा सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एसआरएला दिल्या.