संदीप देशपांडेंचं वादग्रस्त विधान! चौफेर टीकेची झोड; काय घडलं?

    23-Jun-2025
Total Views | 195


मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. सोमवार, २३ जून रोजी संसदीय अंदाज समितीच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या फलकावरून संदीप देशपांडेंची जीभ घसरली.

"तिथे सगळे षंढ लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय?" असे संदीप देशपांडे म्हणाले. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. त्यानंतर "मी त्या वृत्तीबद्दल बोललो आहे. ती वृत्ती षंढपणाची आहे, असे मी बोललो. मी कुठल्याही व्यक्तीला बोललो नाही. यासाठी माझ्यावर कुठलीही कारवाई झाली तरी मी त्याला सामोरे जाण्यास तयार आहे," असे स्पष्टीकरणही संदीप देशपांडे यांनी दिले. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.


यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "संदीप देशपांडेसुद्धा एकेकाळी या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. राज्याच्या सभागृहातील लोकांना षंढ म्हणणे उचित नाही. आम्हालाही बोलता येतं. हा सभागृहाचा अवमान असून येणाऱ्या काळात बरेच आमदार यावरून हक्कभंग आणल्याशिवाय राहणार नाही."

"कोणत्याही विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात भाष्य करताना मनात एखाद्या मागणीची तीव्रता असली तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा आपण ज्या लोकांबद्दल अशा शब्दांचा उपयोग करतो त्यांनाही देवाने तोंड दिले असून त्यांच्या डिक्शनरीतही असे शब्द असू शकतात हे विसरता कामा नये," अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संदीप देशपांडेंना खडेबोल सुनावले.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121