"विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा..."; काय म्हणाले मंत्री दादा भुसे?
18-Jun-2025
Total Views | 20
मुंबई : राज्यभरात सध्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीवरून गोंधळ सुरु असताना आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, "सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक आहे. गेल्या काही वर्षांपासून इयत्ता ५ वी पासून हिंदी विषय आहे. आताच्या घडीला पहिली ते पाचवीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आला आहे."
"सर्वसाधारणपणे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी हिंदीचा वापर केला जातो. ज्या वर्गातील विद्यार्थी तिसर्या भाषेच्या संदर्भात त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाणार आहे. हे करत असताना त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान २० विद्यार्थ्यांची मागणी असल्यास ती भाषा शिकवणारा शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल. कमी विद्यार्थी असल्यास त्यासाठी ऑनलाईन किंवा इतर सुविधा निर्माण करून दिली जाईल," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "ज्या शाळेत मराठी शिकवली जात नाही त्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांना समज देऊनही मराठी शिकवणे सुरु केले नाही तर त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून इतर माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राप्रमाणे शिक्षण दिले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण इंग्रजीचे धोरण स्विकारले आहे. मुंबईतही अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र स्विकारले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे राहू नये यासाठी त्रिभाषेचे सूत्र स्विकारले आहे. विद्यार्थी आणि पालक ज्याप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाईल," असेही ते म्हणाले.