मुंबई: इराण-इस्रायल युद्ध सध्या चांगलेच पेटले असून इस्रायली लष्कराने मंगळवारी असा दावा केला की, इराणी सैन्याचे प्रमुख कमांडर अली शादमानी यांनाही ठार मारण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत इराणचे मेजर जनरल गुलाम अली रशीद यांना ठार मारल्याचा दावा यापूर्वी इस्रायलने केला होता. इस्रायल आणि इराणमधील तणाव सतत वाढत असून दोन्ही देशांतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील पाच दिवसांत दुसर्यांदा ‘आयडीएफ’ने इराणचे युद्धकाळातील चीफ ऑफ स्टाफ, शासनाचे प्रमुख सैन्य कमांडर संपवले आहेत,
‘आयडीएफ’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले. रविवारी, इराणच्या ‘इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चे गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझेमी हे इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. काझेमी यांचे उपप्रमुख हसन मोहाघेग आणि दुसरे एक वरिष्ठ कमांडर मोहसेन बाकेरी हेसुद्धा या हल्ल्यात मारले गेले.
दि. 13 जून रोजीपासून सुरू झालेल्या इराण आणि इस्रायलमधील हवाई युद्धामुळे या प्रदेशात खळबळ उडाली आहे. हे क्षेत्र आधीच ऑक्टोबर 2023 पासून गाझावरील इस्रायलच्या आक्रमणामुळे अस्थिर बनले होते. इस्रायलने इराणवर अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यासाठी हे हल्ले केले जात आहेत, असा दावा केला होता. यानंतर दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये हल्ले सुरू झाले आहेत. यात आजवर 220 पेक्षा अधिक इराणचे नागरिक मारले गेले आहेत.
कोण आहेत अली शादमानी?
इराणच्या एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रशीद यांच्या मृत्यूनंतर अली शादमानी यांना इराणी सैन्याचे नवे प्रमुख कमांडर बनवण्यात आले होते. त्यांना ’खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर’ची कमांड देण्यात आली होती. यापूर्वी दि. 13 जून रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आधीचे इराणी लष्कर प्रमुख अली रशीद मारले गेले. अली शादमानी हे इराणी सैन्याचे प्रमुख कमांडर होते, जे अयातुल्ला अली खामेनी यांच्या अगदी जवळचे मानले जात होते. युद्धकालीन प्रमुख म्हणून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला होता.
शहर सोडा, सुरक्षित ठिकाणी जा
मंगळवारी तेल अवीव आणि जेरुसलेममध्येदेखील स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. इराणमधील भारतीय दूतावासाने तेहरानमध्ये राहणार्या भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना आवाहन केले आहे की, जे लोक स्वतःच्या वाहनाने बाहेर पडू शकतात, त्यांनी शक्य तितक्या लवकर शहर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे. तेहरानमध्ये भीतीचे वातावरण असून लोक मोठ्या संख्येने शहर सोडत असल्याचे सांगण्यात येत आहे. दूतावासाने पहिल्यांदाच अशा प्रकारे लोकांना स्वतः शहर सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे.
बुलेटिन सुरू असतानाच इस्रायलचा स्टेशनवर बॉम्बहल्ला
तेहरान: चॅनेलचे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच इस्रायलने तेहरानमध्ये असलेल्या सरकारी टेलिव्हिजन स्टेशनवर बॉम्बहल्ला करून ते उडवून दिले आहे. या कारणामुळे चॅनेलला थेट प्रक्षेपण बंद करावा लागले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यात थेट प्रक्षेपणादरम्यान झालेल्या स्फोटाचा आवाज ऐकू येतो. या स्फोटामुळे स्टुडिओमध्ये धूर पसरतो आणि अँकरला स्टुडिओतून पळ काढावा लागतो, असे दिसते. इस्रायलने हा स्टुडिओ आणि तेथील परिसर रिकामा करण्यासाठी चेतावणी काही दिवसांपूर्वी दिली होती.