मुंबई महापालिकांच्या शाळेत पालक संघ स्थापन करा! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना
18-Jun-2025
Total Views | 18
मुंबई : मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करा तसेच शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा, अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १७ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
वाळकेश्वर येथील कवळे मठ महापालिका शाळेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सहायक उपायुक्त मनीष वळंजू, कवळे मठ महापालिका शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सायली पाटील यांच्यासह पालिकेच्या डी विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री लोढा यांनी शैक्षणिक साहित्य आणि गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री लोढा यांनी पालकांशीही संवाद साधला. पालक संघाची महिन्यातून एकदा शिक्षकांसोबत बैठक आयोजित केल्याने अनेक प्रश्न सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री लोढा म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महा विभूतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुढच्या पिढीला कळावे यासाठी महिन्यातून एकदा शाळांमध्ये विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करा," अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, यावेळी मंत्री लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.