मुंबई : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी केली.
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत मनीषा कायंदे म्हणाल्या की, "पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक आहे. एका आईचा मृत्यू झाला असून दोन बालके आता आईविना आयुष्य काढतील. आईच्या दुधालादेखील ते मुकले आहेत. यात दोष कुणाचा? या घटनेचे गंभीर परिणाम त्या रुग्णालयाला भोगावे लागतील. या घटनेशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
सामान्य जनतेला देणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे
"पोलिस प्रशासन, आरोग्य खात्यासह सगळ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी मागणी मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करते. आमच्या महिला आघाडीने या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अशा रुग्णालयांचा माजोरडेपणा आणि सामान्य जनतेला त्रास देऊन लुटालूट करणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे," अशी मागणीही मनीषा कायंदे यांनी केली आहे.