न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे ५२ वे सरन्यायाधीश

    16-Apr-2025
Total Views |

 
Bhushan Gavai 52nd Chief Justice of India
 
नवी दिल्ली: ( Bhushan Gavai 52nd Chief Justice of India ) भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी औपचारिक नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून अधिकृतपणे शिफारस केली आहे आणि हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे पाठवला आहे. सध्या, न्यायमूर्ती गवई हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.
 
न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ते १३ मे रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश खन्ना यांची जागा घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती गवई यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असेल आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये ते निवृत्त होतील.
 
न्या. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. त्यांनी १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली. १९९० नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली. न्या. गवई यांनी संवैधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यात वकिली केली. ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.
 
ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या काळात गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १७ जानेवारी २००० रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
 
न्या.गवई १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. मुंबई येथील प्रमुख पदावर तसेच नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांवर सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या असलेल्या खंडपीठांचे अध्यक्षपद भूषवले. २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली.