अमेरिकेची भारतावर आयातशुल्कवाढ , भारतासाठी ठरु शकते प्रगतीची संधी !

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यासह अर्थतज्ज्ञांकडून दावा

    08-Mar-2025
Total Views |
us
 
 
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावरही आयातशुल्क लादले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी २ एप्रिलपासून होईल असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेकडून हे आयातशुल्क आकारले जात असले तरी त्यातून भारतालाच मोठा फायदा होणार असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगीतले आहे. भारतीय अर्थव्यवस्था या यातून होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी सक्षम असून, भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश आपले व्यापारी संबंध वृध्दींगत व्हावे यासाठीच प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला त्याची झळ बसणार नाही. असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
  
अमेरिकेकडून या आयातशुल्कांबाबत स्पष्टीकरण देताना भारताकडून अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या वस्तुंवर लावले जाणारे आयातशुल्क हे जास्त असल्याचे कारण देण्यात आले आहे. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापारातील तुटीचाही संदर्भ देण्यात आला आहे. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. २०२४ च्या आकडेवारीनुसार हा द्निपक्षीय व्यापार हा १२९.२ बिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. यातील तपशील पुढीलप्रमाणे -
 
१) भारताची अमेरिकेकडून केली जाणारी आयात ही २०२३ मध्ये ३.४ टक्क्यांनी वाढून ४१.८ बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.
 
२) भारताची अमेरिकेला होत असलेली निर्यात ४.५ टक्क्यांच्या वाढीसह ८७.४ बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.
 
३) या द्विपक्षीय व्यापारातील तूट ही ४५.७ बिलियन डॉलर्स इतकी आहे. अमेरिकेकडून हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.
 
भारत सरकारकडून भारतीय निर्यातीला बळ देण्यासाठी आयात होणाऱ्या वस्तुंवर आयातशुल्क लादले जात आहे. याचसाठी अमेरिकेकडून भारतावर उलट आयातशुल्क लादले जात आहे असा दावा अमेरिकेकडून केला जात आहे.
 
भारताला यातून कसा फायदा होणार ?
 
अमेरिकेकडून लादल्या गेलेल्या या आयातशुल्क प्रश्नावर तोडगा काढला जाईलच परंतु यातून भारताला अनेक व्यापाराच्या संधी खुल्या होणार आहेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
१) भारताला या आयातशुल्कवाढीमुळे नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसह देशांतर्गत बाजारपेठही मजबूत करता येईल. भारताला इतर आशियाई देश, आफ्रिकेतील देश यांच्याशी व्यापार वाढवणे सोपे होईल.
 
२) भारत सरकार सध्या करत असलेल्या मुक्त व्यापार करारांना गती देता येईल. सध्या भारताकडून युरोपीयन संघ, ग्रेट ब्रिटन या देशांशी मुक्त करार धोरणाबद्दल वाटाघाटी करत आहे. तसेच अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांशीही या कराराबाबत वाटाघाटी करत आहे.
 
३) सध्या सुरु असलेल्या अमेरिका – चीन व्यापारयुध्दाचा भारताला फायदा घेता येऊ शकतो ज्यातून भारत हे जागतिक गुंतवणुकीचे नवीन केंद्र म्हणून उदयाला येऊ शकतो.
४) भारताला देशांतर्गत व्यापारवाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे सोयिस्कर ठरणार आहे. ज्यातून भारताला तंत्रज्ञानातील प्रगती साधणे शक्य होईल.
 
असे प्रमुख लाभ भारताला होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांतून भारताला आपली प्रगती साधणे शक्य होणार आहे.