मुंबई : भारतातील हॉस्पीटॅलिटी क्षेत्रातील महत्वाची कंपनी असलेल्या ओयो कडून लवकरच आयपीओ आणण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. ओयो कंपनीकडून तसे संकेत दिले गेले आहेत. कंपनीकडून यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्याआधीच हा आयपीओ बाजारात दाखल होईल, ओयो कंपनीचे संस्थापक रितेश अगरवाल यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी हा आयपीओ महत्वाचा ठरणार आहे. कंपनीने २०१९ साली घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी कंपनीला यावर्षी आयपीओ बाजारात आणणे भाग असल्याने हा आयपीओ आणला जात आहे.
रितेश अग्रवाल यांनी २०१९ मध्ये सॉफ्ट बँक समुहाकडून २.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी हमी या सॉफ्ट बँक समुहाचे प्रमुख मित्सुशी सन यांनी दिली होती. २०२७ पर्यंत अगरवाल यांना या कर्ज फेडीच्या क्षमता सिध्द कराव्या लागणार आहेत. याचाच भाग म्हणून आता अगरवाल आयपीओ बाजारात आणण्याची शक्यता आहे. अगरवाल यांनी हे कर्ज कंपनीच्या व्यवसायवृध्दीसाठी तसेच ओयो कंपनीमधील आपला हिस्सा वाढवण्यासाठी घेतले होते. सध्या असलेल्या कर्जामुळे सॉफ्ट बँक समुह हा ओयोमधील सर्वात मोठा भागीदार आहे. त्यांची भागीदारी ४० टक्क्यांहून अधिक आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉस्पीटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या एअरबीएनबी कंपनीला स्पर्धा म्हणून रितेश अगरवाल यांनी २०१३ मध्ये ओयो कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीची स्थापना झाल्याच्या काही वर्षांतच अगरवाल यांनी सॉफ्टबँक्स सन याच्याकडून कर्ज मिळवले. या मिळालेल्या अर्थसहाय्यामुळे ओयोचा विस्तार फक्त भारतच नाही तर जपान, अमेरिका या देशांमध्येही झाला. २०२० मध्ये आलेल्या कोरोना महासाथीच्या संकटामुळे ओयो कंपनीला मोठ्या प्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते. त्या धक्क्यातून सावरत मार्च २०२४ पर्यंत कंपनीने आपले सगळे नुकसान भरुन काढले आहे असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.