भारतीयांसाठी खुशखबर, पेट्रोल- डिझेल स्वस्त होण्याची शक्यता
ओपेक संघटनेकडून उत्पादन वाढवण्याची घोषणा
05-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खनिज तेलांच्या किंमती हा कायमच चिंतेचा विषय असतो. खनिज तेलाचे दर वाढले की आपल्याकडे पेट्रोल - डिझेलचे दर भडकतात आणि त्यातून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसतो. आता हाच वाढीव भुर्दंड कमी होणार आहे. खनिज तेल उत्पादक देशांची जागतिक संघटना असलेल्या ओपेक प्लस या संघटनेकडून खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या उत्पादनवाढीमुळे खनिज तेलांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओपेकच्या या निर्णयाला अमेरिकेकडून कॅनडा, चीन आणि मेक्सिको या देशांवर लादल्या गेलेल्या वाढीव आयातशुल्काची पार्श्वभूमी आहे.
अमेरिकेकडून लादल्या गेलेल्या या आयातशुल्काचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्याप्रमाणावर होत आहेत. अमेरिकेकडून उचलल्या गेलेल्या पावलांच्या विरोधात चीन सारख्या देशांकडून उत्तर देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील गुंतवणुकदार धास्तावले असून उत्पादनांवरही त्याचा परिणाम होणार असल्याने खनिज तेलाची मागणीत घसरण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ओपेक प्लस या संघटनेने जाहीर केल्यानुसार या संघटनेचे सदस्य देश हे एप्रिलपासून दररोज १ लाख ३८ हजार बॅरल्सने खनिज तेलाचे उत्पादन वाढवतील. अमेरिकेतील
खनिज तेलांच्या किंमती एक डॉलरने घसरुन, ६६.७७ डॉलर प्रती बॅरलवर घसरल्या आहेत. या आणखी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कारणासाठीच ओपेक प्लस या संघटनेकडून हा निर्णय घेतला गेला आहे. या संघटनेकडून २०२२ नंतर प्रथमच उत्पादनवाढीची घोषणा झाली आहे.
ओपेक ही सर्व खनिज तेल उत्पादक देशांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणारी संघटना आहे. सुरुवातीला ही फक्त आखाती देशांचीच संघटना होती, परंतु नंतर या संघटनेत रशिया आणि व्हेनेझ्युएला या दोन प्रमुख खनिज तेल उत्पादक देशांचा समावेश झाल्यावर तिचे नामकरण ओपेक प्लस असे करण्यात आले.