रेल्वेच्या आणखी दोन कंपन्याना नवरत्न दर्जा, रेल्वेच्या कामगिरीवर मान्यतेची मोहोर

आयआरसीटीसी, आयआरएफसी या दोन कंपन्यांना मिळाला नवरत्न दर्जा

    04-Mar-2025
Total Views |
 
irctc
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या अजून दोन कंपन्याना नवरत्न दर्जा प्राप्त झाला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत. आता रेल्वेच्या बारापैकी सात कंपन्याना नवरत्न दर्जा मिळाला आहे. यामुळे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि त्यांची उद्योगक्षमता यांच्यावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. ३ मार्च रोजी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारताचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल दोन्ही कंपन्यांचे अभिनंदन केले आहे.
 
 
 
 
 
भारतीय रेल्वेच्या १२ कंपन्यांपैकी आतापर्यंत सात कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळाला आहे. २०१४ साली कॉन्कॉर ही असा नवरत्न दर्जा मिळालेली रेल्वेची पहिली कंपनी होती. आता पर्यंत कॉन्कॉर, आरव्हीएनएल, आयआरकॉन, आरआयटीईएस, रेलटेल या पाच कंपन्या आहेत ज्यांना याआधी नवरत्न दर्जा मिळाला होता. याच यादीत आता आयआरसीटीसी आणि आयआरएफसी या दोन कंपन्यांची भर पडली आहे. भारतीय रेल्वेची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत असल्याने, प्रवाशांची पसंती, वक्तशीरसेवा या सर्वच पातळ्यांवर रेल्वे लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
 
नवरत्न दर्जा काय असतो आणि त्याचे फायदे काय?
 
भारत सरकार आपल्या सरकारी कंपन्यांचे तीन स्तरांत वर्गीकरण करते, मिनीरत्न, महारत्न आणि नवरत्न. नवरत्न हा त्यातील अत्युच्च दर्जा आहे. ज्या सरकारी कंपन्यांनी बाजार व्यवस्थेत तसेच आर्थिक पातळीवर उत्तम कामगिरी केली असेल अशा कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला जातो. भारत सरकार हा दर्जा देत असते. यांमुळे त्या कंपन्यांना त्यांचा व्यवसाय विस्तारासाठी अधिक स्वातंत्र्य दिले जाते. या कंपन्यांना आता १००० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीचे स्वातंत्र्य मिळेल, तसेच ते इतर नवरत्न कंपन्यांशी स्वतंत्रपणे करार करुन संयुक्त उपक्रमही चालू करु शकतात.