मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Balidan Maas) लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या दडलेल्या इतिहासाबाबत पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चा होऊ लागल्या. चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या बहुतांश प्रेक्षकांचे डोळे पाणावलेलेच दिसले. एकाअर्थी छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान पाहून त्यांच्याप्रती असलेला आदर कित्येक पटीणे आणखी वाढला. ज्यादिवशी आपल्या शंभुराजांनी आत्मबलिदान दिले, तो दिवस होता फाल्गुन अमावस्या. २०२५ या वर्षी २९ मार्च हा दिवशी तो दिवस आला आहे. त्यानिमित्ताने बलिदान मास सुरु झाला आहे. या बलिदान मास मध्ये काय करता येईल? तो शिवभक्तांनी कसा पाळावा? वाचा सविस्तर
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत १२० ते १५० युद्धे लढली आणि त्यापैकी एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे स्वराज्याची धुरा सांभाळली. छावा चित्रपटातील एका डायलॉग प्रमाणे "सिवा गया लेकीन अपनी सोच छोडके गया..." असे औरंग्याला कायम वाटत होतं. त्यामुळे शंभुराजांच्या पराक्रमी शौर्यामुळे औरंगजेबाला चांगलाच त्रास होऊ लागला. मात्र नंतर संभाजी महाराजांना जेव्हा कैद करण्यात आलं...तेव्हा औरंगजेबाने क्रूरता आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांची जीभ कापली, डोळे बाहेर काढले. त्याच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला गेला आणि त्याबदल्यात औरंगजेबाने संभाजी महाराजांना आपला जीव वाचवण्याचे आश्वासन दिले. संभाजी महाराजांनी आत्मबलिदान दिले परंतु ते धर्मांतरित झाले नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाच्या छाताडावर पाय देऊन स्वराज्य निर्माण केले. हेच स्वराज्य पुढे वाढविण्याचे सर्वात महत्वाचे कार्य हे धर्मवीर संभाजी महाराजांनी केले. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युगपुरुष, धर्मपुरुष जन्माला येतात. आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची जाणीव आपल्याला असावी म्हणून हा धर्मवीर बलिदान मास साजरा केला जातो. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत तो पाळला जातो.
या दिवसांत काय करावं तर, पंढरीच्या पांडुरंगासाठी वारकरी मंडळी ज्याप्रमाणे उपवास ठेवतात, अनवाणी वारी मध्ये चालतात... त्याचप्रमाणे जर आपण बलिदान मास मध्ये अगदी उपवास नाही पण किमान एक वेळचं जेवण न करता राहू शकतो का? त्याचबरोबर वारकऱ्यांप्रमाणे बलिदान मासात अनवाणी फिरता येईल का याचा विचार करावा. ज्याने पायाला एखादा खडा टोचला किंवा चटका बसेल तेव्हा आपल्याला शंभू राजांच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
बलिदान मास असल्याने आनंदाच्या, उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे हा त्यामागील एक भाग आहे. परंतु आपल्या परिसरातील चौकात धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजांची प्रतिमा लावून त्यास नागरिकांच्या उपस्थितीत महिनाभर पुष्प अर्पण करून अभिवादन करणे, असं काहीसं आपण करू शकतो. बलिदान मास साजरा करण्याची कोणावर सक्ती नाही मात्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या धर्मासाठी, माझ्या राष्ट्रासाठी केलेले आहे, ही भावना ज्या ज्या हिंदूंच्या मनात आहे, त्यासर्वांसाठीच हा पायंडा आहे.