मुंबई : भारतीय जाहीरात क्षेत्राच्या वाढीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. डेन्टसु ४ इएम डिजीटल २०२५ या अहवालानुसार भारतीय जाहीरात क्षेत्र या वर्षाअखेरी पर्यंत ६.५ टक्के इतक्या दराने १ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या या वाढीमागे डिजीटल जाहीरातींचा मोठा वाटा असणार आहे असे हा अहवाल नमूद करतो. भारतात जाहीरात क्षेत्र सातत्याने वाढत आहे. २०२१ मध्ये या क्षेत्राचा एकूण आकार ७२,६०३ कोटींवर होता. तो दरवर्षी सातत्याने वाढत २०२५ च्या अखेरीस १ लाख ०७ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
या जाहीरात क्षेत्राचा सर्वाधिक वाटा हा डिजीटल जाहीरातीने व्यापला आहे. एकूण उलाढालींतील ४९ टक्के वाटा उचलत ४९,२५१ कोटी इतका या क्षेत्राचा आकार पोहोचला आहे. यामागोमाग २८ टक्क्यांसह टिव्ही क्षेत्र २८,०६२ कोटींची उलाढाल करते. त्यानंतर मुद्रीत माध्यमांचा नंबर लागतो. १७ टक्क्यांच्या वाट्यासह १७, ५२९ कोटींची उलाढाल हे क्षेत्र करते. या सर्व उलाढालींच्या वाढीमागे टीव्ही वर चालणारे रिऍलिटी शोज, खेळांचे कार्यक्रम तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म्सची वाढती लोकप्रियता, या कार्यक्रमांसाठी होणाऱ्या खर्चात वाढ करते. असे हा अहवाल सांगतो.
या जाहीरात वाढीसाठी इ-कॉंमर्स, वाहननिर्मिती, बँका, इन्श्युरन्स क्षेत्र, एफसीजी क्षेत्र या सर्व क्षेत्रांमधून जाहीरातींवर वाढलेल्या खर्चाचा वाटा आहे. याव्यतिरिक्त एअरपोर्टवरती डिस्प्ले केल्या जाणाऱ्या जाहिराती, त्यानंतर इतर डिस्प्ले जाहीराती यांच्यावरचा खर्च देखील वाढला आहे. यामुळे देशातील जाहीरात क्षेत्रातील उलाढाल ही २०२६ या वर्षापर्यंत सातत्याने वाढणार असेच दिसत आहे. २०२६ पर्यंत या क्षेत्राचा वाढीचा दर ७.२ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढची काही वर्षे तरी जाहीरात क्षेत्राचा बोलबाला असाच सुरु राहणार आहे असेच या अहवालातून स्पष्ट होते.