संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपी अटकेत!
04-Jan-2025
Total Views |
बीड : (Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी सिद्धार्थ सोनवणे याला मुंबई येथून अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना केज येथील न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १८ जानेवारीपर्यंत 'सीआयडी' कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या सात आरोपींपैकी तीन आरोपी फरार होते. एसआयटीच्या विशेष पथकाकडून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर एसआयटीच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तीन पैकी दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्याजवळ अटक केली आहे. यातील कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे.
हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या दोन मुख्य आरोपींसह, हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यविधीलादेखील तो उपस्थित होता, अशी माहिती आहे.