शौर्य आणि धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
शिंदे आणि शेंडे घराण्याचे ऋणानुबंध रेखाटणारे ‘प्रकाशातून प्रकाशाकडे’ पुस्तक प्रकाशित
03-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : शौर्य आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन महादजी शिंदे आणि शिंदे घराण्याने असाच इतिहास घडवला असून तो पुढे आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि पूर्वोत्तर विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केले आहे.
शिंदे राजघराण्याचे राजोपाध्ये असणाऱ्या शेंडे घराण्याचे शिंदे घराण्याशी असलेल्या शतकांच्या ऋणानुबंधाचे चित्रण करणाऱ्या “प्रकाशातून प्रकाशाकडे – स्थलांतर व स्थित्यंतर: शेंडे घराण्याचा बहुआयामी प्रवास” या पुस्तकाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते संचार भवनस्थित त्यांच्या कार्यालयात प्रकाशन झाले. या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री शिंदे यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, या पुस्तकाद्वारे शिंदे घराण्याचे शौर्य आणि शेंडे घराण्याचे अध्यात्म अधोरेखित झाले आहे. ही केवळ दोन घराण्यांची कहाणीच नसून त्यांचा एकमेकांशी समांतर असलेला प्रवासही आहे. महादजीं शिंदे यांच्यापासून सुरु झालेले दोन्ही घराण्याचे संबंध आजही कायम आहेत. आजही शिंद्यांच्या घरातील पूजा आणि देवधर्म शेंडे कुटूंबच सांभाळते. दोन्ही कुटुंबांमध्ये अतिशय घरोब्याचे संबंध असून पुढेही हे संबंध असेच राहतील, असे केंद्रीय मंत्री शिंदे यांनी म्हटले.
शौर्य आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे केंद्रीय मंत्री शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन महादजी आणि शिंदे घराण्याने त्यानुसारच इतिहास घडवला आहे. मराठ्याचा हा काळ भारतीय इतिहासातील एक देदीप्यमान पर्व असून तो जाणीवपूर्वक दडपून ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. आता मात्र हा इतिहास देशासमोर आणण्याची गरज आहे, असेही केंद्रीय मंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले आहे.
पराक्रम आणि अध्यात्म यांचा प्रवास मांडणारे हे पुस्तक असल्याचे लेखक दत्ता जोशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आज शेंडे घराण्यातील सदस्य देशविदेशात विखुरलेले आहेत. मात्र, त्यांना आपल्या मूळांची जाणीव असावी, हा हेतू या पुस्तकाच्या लेखनात असल्याचे लेखक डॉ. राजेंद्र शेंडे यांनी नमूद केले आहे.