मुंबई, दि. २८: विशेष प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो वाहतूक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यूके सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या (डीएफटी) क्रॉसरेल इंटरनॅशनल (सीआय) यांच्या माध्यमातून यूके सरकारशी सामंजस्य करार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांच्या पुढाकाराने तर जोनाथन रेनॉल्ड्स, सेक्रेटरी- बिझनेस अँड ट्रेड, पॉल डायसन, सीईओ-क्रॉसरेल इंटरनॅशनल यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईतील मेट्रो नेटवर्कचे काम वेगाने पूर्ण करून झपाट्याने होणाऱ्या शहराच्या विकासाला पाठबळ देणारी एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.तसेच, एमएमआरडीए हे भारतातील शहरी पायाभूत सुविधांसाठी आदर्श प्राधिकरण म्हणून स्थापित करणे हा यामागील मुख्य हेतू आहे. एमएमआरडीएतर्फे सध्या ३३७ किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे. यापैकी भूमिगत मेट्रो मार्गिकेसह सुमारे ५९ किमी अंतराच्या मार्गिका सुरू आहेत.
ठळक वैशिष्ट्ये
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या या करारामध्ये जागतिक दर्जाची इंटरमोडल (विविध वाहतूक पर्याय म्हणजे मेट्रो, बस सेवा, रिक्षा-टॅक्सी सेवा यांचा समन्वय साधून प्रवाशांचा प्रवास सुरळीत करणे) वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यात मुंबईतील आगामी १४-लाइन मेट्रो नेटवर्कच्या कामकाजाचा आणि देखभाल धोरणाचाही समावेश आहे. यूकेचे व्यापार सचिव जॉनथन रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसंदर्भात यूके आणि भारत यांच्यातील सहकार्य आणखी मजबूत करण्यावर चर्चा केली. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रातील आपले कौशल्य उपलब्ध करून देणे, गुंतवणुकीला चालना देणे आणि रोजगारनिर्मिती करणे आहे.
भागीदारांविषयी
यूके डिपार्टमेंट फॉर ट्रान्सपोर्ट (डीएफटी)
यूकेमधील वाहतूक पायाभूत सुविधांची देखरेख करणारी केंद्रीय संस्था म्हणून डीएफटीतर्फे आर्थिक विकास, जोडणी आणि शाश्वततेवर भर देण्यात येतो. सार्वजनिक परिवहनात सुधारणा करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वयंचलित व पर्यावरणपूरक वाहतूक तंत्रज्ञानाला चालना देणे हे त्यांच्या धोरणांचे उद्दिष्ट आहे.
क्रॉसरेल इंटरनॅशनल (सीआय)
डीएफटी अंतर्गत कार्यरत असलेले सीआय हे यूके सरकारचे शासकीय प्राधिकरण असून जगभरातील जटिल रेल्वे प्रकल्पांसाठी धोरणात्मक सल्लागार सेवा देण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. क्रॉसरेल (एलिझाबेथ लाइन) प्रकल्पाचा अनुभव आणि जागतिक मानांकनाचा आधार घेत, सीआयतर्फे हे प्राधिकरण शाश्वत आणि प्रभावी वाहतूक उपाययोजना विकसित करण्यात मदत करण्यात येते.