पालघरचा नियोजनबद्ध विकास होणार : डॉ. इंदू राणी जाखड

पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद

    27-May-2025
Total Views |

dr. indurani jakhad


वाढवण बंदर प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प यांसारखे पालघर जिल्ह्याला आंतराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणार आहेत. अशा मोठ्या प्रकल्पांसोबतच पालघर जिल्हा आता चौथी मुंबई म्हणून ओळख मिळविण्यासाठी सज्ज होतो आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील तरुणांनीही आवश्यक कौशल्ये विकसित करून या विकासधारेत यावे यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्नशील आहे. याच मुद्यावर पालघरच्या जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.


१०० दिवस कृती आराखडा अंतर्गत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्या सुधारणा करण्यात आल्या?


पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व रेकॉर्ड तपासून याचे वर्गीकरण करण्यात आले. आज सर्व विभागाच्या रेकॉर्ड रूम अद्ययावत झाल्या आहेत. यानिमित्ताने कार्यालयीन सुसूत्रता आली. विशेषतः नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी आता आपण ९ दिवसांवर आणला आहे. याचा फायदा महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. पालघर जिल्ह्यात केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प सुरु आहेत किंवा पालघरमधून जात आहेत. अशावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सुसंवाद महत्वाचा विषय होता. हे विषय मार्गी लावण्यासाठी काही विशेष नोडल अधिकाऱ्यांची आणि कक्षाची नेमणूक केली आहे.
केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प पालघरमध्ये सुरु आहेत. याअनुषंगाने पालघर जिल्ह्यासमोर विकासाच्या नेमक्या कोणत्या संधी सध्या दिसत आहेत?


इतिहासात सांगतो की, एखाद्या ठिकाणी रास्ता किंवा परिवहन संबंधित कोणतेही प्रकल्प आले की, त्या भागाचा चौफेर विकास होतो. आता पालघरमध्ये वडोदरा एक्सप्रेसचे काम सुरु आहे. रेल्वे कनेक्टिव्हीटीमध्ये हायस्पीड रेल्वेचे, उपनगरीय रेल्वेत एमयूटीपी ३ आणि ३ अ अंतर्गत रेल्वे चौपदरी, मालवाहतुकीसाठी यार्ड उभारणीचे काम सुरु आहे. वाढवण बंदर हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एकत्रितपणे सुरु असलेला प्रकल्प आहे. हे भारतातील सर्वात मोठे आणि जागतिक पातळीवर पहिल्या १०मध्ये गणले जाईल इतके मोठे बंदर असेल. याचसोबत या बंदराला विमानतळाची सुविधादेखील असणार आहे. पालघर गुजरात राज्य आणि मुंबईला जोडणारा जिल्हा आहे. त्यामुळे अधिकाधिक विकासप्रकल्प येथूनच जात आहेत. अनुषंगाने ट्रान्सीट ओरिएण्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेतून पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर विकासकामे अपेक्षित आहेत. या विकासाचा आराखडा बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जेणेकरून पालघरचा सुसंगत आणि नियोजनबद्ध विकास होईल. यामुळेच पालघरची राज्यात आणि देशात एक वेगळी ओळख निर्माण होईल.
पालघर जिल्ह्यात आदिवासी बहुल क्षेत्र अधिक आहे. याभागात कायमच आरोग्य आणि शिक्षण या समस्या भेडसावत असतात. या समस्या सोडविण्यासाठी कोणते उपक्रम हाती घेतले आहेत?


आपला जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. अनेक वर्षांपासून इथे प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे. यासोबतच १० वर्षांपूर्वी पालघर हा नवा जिल्हा घोषित झाला. एका नव्या जिल्ह्यासमोर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चरची जी आव्हाने असतात ती सर्व येथेही होती. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा आढावा घेतल्यास याभागात मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये, ट्रॉमा सेंटर आणि जव्हारजवळ एक उपजिल्हा रुग्णालये मंजूर आहे. यापैकी काही कामं अंतिम टप्प्यात आहेत तर काही कामे सुरु करायची आहे. मी स्वतः एक डॉक्टर असल्याने आणि जिल्ह्याची आवश्यकता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यास माझे प्राधान्य आहे. प्राथमिक आरोग्यसुविधांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. जिल्हापरिषदाच्या माध्यमातून पीएम जनमन आणि धरती आभा हे दोन प्रमुख केंद्र सरकारचे उपक्रम सुरु आहेत. या अभियानातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
याभागात शिक्षण दोन विभागात आहे. येथे काही शाळा जिल्हापरिषदेच्या आहेत तर काही आश्रमशाळा आहेत. यापैकी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील पायाभूत सुविधांच्या कमतरता भरून काढण्याला आम्ही सध्या प्राधान्य देत आहोत. तिथे शैक्षणिक निकाल आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यावर भर देणार आहोत. यामध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील पाच-दहा वर्षांनी निर्माण होणाऱ्या उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून मुलं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ म्हणून तयार असतील. त्यांना याचठिकाणी चांगली नोकरी मिळाले. यातूनच या मुलांचे जीवनमान उंचावेल. 'डेव्हलपमेंट फॉर द पीपल' असाच आमचा सर्वांचा मानस आहे.
तुमच्या निमित्ताने पालघरला पहिली महिला जिल्हाधिकारी लाभली आहे. याभागात महिलांचे आरोग्य आणि बालकांचे पोषण यासाठी आपण काय करणार आहात?


पालघर हे मुंबईच्या इतक्या जवळ असूनही इथे माता मृत्युदर आणि कुपोषणच्या घटना इथे घडतात याच मलाही अत्यंत दुःख आहे. या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मी निश्चित तत्पर असणार आहे. आत्ता पर्यंतच्या आढाव्यात असे लक्षात येते की, गरोदर महिलांचे आरोग्य आणि कमी वय हे याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे आमचा पहिला फोकस मुलीच्या लग्नाचे वय वाढविणे आहे. यामध्ये जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणाकडे वळविणे याला आमचे प्राधान्य आहे. मुलीच्या गर्भधारणेचे वय जर वाढले तर आपोआप माता मृत्युदर कमी होतील. कुटुंब नियोजनाबाबतच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत. दोन मुलांमधील अंतर जर कमी असेल तरीही आईचे आरोग्य आणि कुपोषणाच्या समस्या निर्माण होतात. याबाबत सर्व अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रे यांनाही वेळोवेळी सूचित करत आहोत.कुपोषण हा पालघरशी एकदम जोडलेला विषय आहे. आगामी २-३ वर्षात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि संपविण्यासाठी काही सामाजिक संस्था आणि आम्ही एकत्रित येत काम करण्याचा आमचा मानस आहे.
पालघरमध्ये मान्सूनपूर्व तयारी नेमकी कशी सुरु आहे?


पावसाळापूर्व प्रशासनाकडून जी तयारी अपेक्षित असते जसे की, नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. काही रस्त्यातील वाहतुकीची कोंडी करणारे अरूंद भाग आम्ही मोकळे केले आहेत. कोणतीही आपत्ती आली तर प्रशासन तात्काळ नियंत्रण करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी सज्ज आहे. वीजवाहिन्यासंदर्भात जर काही तक्रार आली तर तात्पुरती व्यवस्था उभारणे आणि लवकरात लवकर समस्या सोडविण्यावर आमचा भर असेल. आमच्या आपत्तीजनक परिस्थिती संदर्भात काही मॉक ड्रिलही झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही आणीबाणी आणि आपत्तीजनक काळासाठी आम्ही सज्ज आहोत.