नवी दिल्ली : “गर्व से कहो हम हिंदू हैं, हिंदुस्तान हमारा हैं” या घोषणेद्वारे हिंदू समाजाला श्रीरामजन्मभूमी आंदोलनसाठी तयार करणाऱ्या ‘विद्युल्लता’ साध्वी ऋतंभरा यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जाहिर करण्यात आला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथेप्रमाणे २५ जानेवारी रोजी सायंकाळी पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणी केली. यंदा ७ ‘पद्मविभूषण’, १९ ‘पद्मभूषण’ आणि ११३ ‘पद्मश्री’ जाहिर करण्यात आले आहेत.
डॉ. दुव्वूर नागेश्वर रेड्डी यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मविभूषण’ जाहिर करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी माजी सरन्यायाधीश जगदीश सिंग केहर, कला क्षेत्रासाठी कुमुदिनी रजनीकांत लाखिया आणि लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांना ‘पद्मविभूषण’ जाहिर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी एम. टी वासुदेवन नायर, लोकगायिका शारदा सिन्हा आणि जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री राहिलेले ओसामु सुझुकी या तिघांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी १९ ‘पद्मभूषण’ जाहिर करण्यात आले आहेत. पत्रकार ए. सूर्यप्रकाश, अभिनेते अनंत नाग, कलाकार जतीन गोस्वामी, वैद्यकीय क्षेत्रातील जोस चाको पेरियप्पुरम, पुरातत्व क्षेत्रातील कैलाश नथ दिक्षीत, उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी आणि पंकज पटेल, कलाकार नंदमुरी बालक्रिष्ण, खेळाडू पी. आर. श्रीजेश, पत्रकार – लेखक राम बहादुर राय, साध्वी ऋतंभरा, कला क्षेत्रातील एस. अजित कुमार, शेखर कपुर आणि शोबना चंद्रकुमार, अभियांत्रिकी क्षेत्रातील विनोद धाम यांना ‘पद्मभूषण’ जाहिर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख बिबेक देबरॉय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि गायक पंकज उधास यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ जाहिर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून ११ ‘पद्मश्री’
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ११ व्यक्तींनी ‘पद्मश्री’ जाहिर करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातील अरुंधती भट्टाचार्य, कला क्षेत्रातील जसपिंदर नरुला, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, बासरीवादक रोणू मुजूमदार, सुलेखनकार अच्युत पालव, कृषी क्षेत्रातील सुभाष खेटुलाल शर्मा आणि डॉ. विलास डांगरे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहिर झाला आहे.
सन्मान रा. स्व. संघ स्वयंसेवकांचा
केंद्र सरकारने जाहिर केलेल्या यादीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक (रा. स्व. संघ) आणि संघप्रेरित संस्थांच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला आहे.
वनबंधू चैत्राम पवार
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या वनवासी पाड्यामध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने ग्रामसुधारणा घडविणारे चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. त्यांनी शाश्वत वनवासी उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि समुदायाद्वारे महाराष्ट्र आणि गुजरातमधील १०० हून अधिक गावांमध्ये परिवर्तन केले आहे. ९९० च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन राबविण्यास मदत करून ४०० हेक्टर जंगलाचे जतन केले आणि ५,००० हून अधिक झाडे वैयक्तिकरित्या लावली.
त्यांनी ८ धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या आणि ४८ पक्ष्यांच्या प्रजातींना आश्रय देणारी जैवविविधतेचे संरक्षण केले आणि ४३५ प्रजातींची झाडे, लता आणि झुडुपे यांचे जतन केले. माती आणि जलसंधारणासाठी समुदायाचा सहभाग वाढवला, ४८५ लहान बंधारे, ४० मोठे बंधारे, ५ किमीचे सतत कंटूर ट्रेंच बांधले, धुळ्यात भूजल पातळी लक्षणीयरीत्या वाढवण्याचे प्रयत्न केले.नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी पारंपारिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी बारीपाडा गावात पीबीआरची (पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर) मुहूर्तमेढही त्यांनी रोवली आहे.
डॉ. विलास डांगरे
रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, नागपुरातील सोमलवाडा विभाग संघचालक अशी जबाबदारी असलेल्या डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल पद्मश्री जाहिर झाला आहे. ७० वर्षांचे दृष्टिहीन होमिओपॅथिक डॉक्टर, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर नाममात्र खर्चात ५० वर्षांपासून समर्पित आहेत. नागपूरमध्ये डॉ. विलास डांगरे होमिओपॅथी क्लिनिकची स्थापना केली - जेथे त्यांनी १ लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. त्वचा आणि मानसिक आजारांचे तज्ज्ञ, ते 'नद्दी' ची तपासणी करून रोग शोधतात. नेत्ररोगाचा सामना करत असतानाही त्यांचे काम आजही सुरूच आहे. डॉ. डांगरे हे दैनिक नागपूर तरुण भारतचे संचालन करणाऱ्या नरकेसरी प्रकाशनाचे अध्यक्ष आहेत.