भारताने चीनला मागे टाकत आणखी एक नवी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. जागतिक आव्हाने कायम असतानाही, भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेली लवचिकता भारताच्या वाढीला चालना देत आहे. चीनची वाढ मंदावलेली असून भारताची मात्र विक्रमी वेगाने होणारी वाढ ही नवा लौकिक भारताच्या नावावर करणारी ठरली आहे.
'एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्स’मध्ये वजनाच्या बाबतीत भारताने, चीनला मागे टाकले आहे. सप्टेंबर महिन्यात भारताने ही कामगिरी केली असल्याचे ‘मॉर्गन स्टॅनली’ने जाहीर केले आहे. या निर्देशांकात भारत चीनच्या 21.58 टक्क्यांच्या तुलनेत 22.27 टक्के इतका राहिला. यात 3 हजार 355 समभाग असून, त्यात लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. 27 उदयोन्मुख बाजार देशांमधील समभागांच्या तुलनेत, ही आकडेवारी जाहीर केली जाते. चीनमधील आर्थिक अडचणींमुळे चिनी बाजारपेठा अडचणीत आल्या आहेत, तर भारताच्या बाजारांना अनुकूल आर्थिक परिस्थितीचा फायदा झाला आहे. अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने जी प्रभावी कामगिरी केली आहे, त्याचे प्रतिबिंब भारतीय बाजारात उमटले आहे. केंद्र सरकारची स्थिर आर्थिक धोरणे आणि भारतीय कॉर्पोरेट्सच्या दमदार कामगिरीमुळे, भारतीय बाजाराने चांगली कामगिरी केली आहे. त्याचेच प्रतिबिंब या निर्देशांकात उमटले आहे, असे म्हणता येईल.
2024 सालच्या सुरुवातीच्या काळात थेट विदेशी गुंतवणुकीत झालेली 47 टक्के वाढ, कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती, आणि भारतीय कर्जबाजारात विदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक, हे घटक भारताची कामगिरी चांगली करणारी ठरले. म्हणूनच, या निर्देशांकांमध्ये भारतीय समभागांचे सापेक्ष वजन वाढले आहे. चीनच्या समभागांची कमी झालेली किंमत, आणि भारतीय समभागांची वाढलेली किंमत, भारताचे वजन वाढवणारी ठरली. दि. 24 मार्च ते दि. 24 ऑगस्ट या कालावधीत, या निर्देशांकात भारत 18 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. याच कालावधीत, चीन 25.1 टक्क्यांवरून 24.5 टक्क्यांवर घसरला. या फेरबदलानंतर भारतीय शेअर बाजारात सुमारे चार ते 4.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होऊ शकते, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. आर्थिक वाढ आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचा वेग कायम ठेवण्यासाठी, देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकदारांकडून भांडवलाची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर जागतिक ईएम निर्देशांकात भारताचे वाढलेले वजन महत्त्वाचे असेच आहे.
मॉर्गन स्टॅनलीने जाहीर केलेली ही आकडेवारी ,जागतिक गुंतवणुकीच्या परिदृष्यात भारताच्या वाढत्या विकासाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. आर्थिक कामगिरीपासून ते धोरणात्मक निर्णयांपर्यंतच्या अनेक घटकांमुळे, गुंतवणुकदारांच्या निर्णयांमध्ये जो बदल होतो तो यातून स्पष्टपणे दिसून येतो. एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्स हा, उदयोन्मुख मार्केट इक्विटी कामगिरीसाठी एक व्यापकपणे मान्यताप्राप्त निर्देशांकआहे. यात 27 देशांतील कंपन्यांचा समावेश आहे. या निर्देशांकात भारताचे सुधारलेले योगदान, हे त्याच्या मजबूत आर्थिक विकासाचा, तसेच संरचनात्मक सुधारणांचे प्रतिबिंब आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणार्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. वाढत्या मध्यमवर्गामुळे तसेच शहरीकरणामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी, आर्थिक विस्ताराला चालना देत आहे.
भारतामध्ये युवा लोकसंख्या मोठ्या संख्येने आहे. यात कुशल कामगारांचा मोठा वर्ग असून, दीर्घकालीन शाश्वत आर्थिक वाढीची क्षमता या वर्गात आहे. लोकसंख्याशास्त्रीय फायदा भारताला विकास आणि आर्थिक विस्ताराला बळ देणारा आहे, हे प्रमुख कारण असल्याचे म्हणता येते. सरकारने वस्तू आणि सेवा कर, आणि दिवाळखोरी कायद्यात केलेल्या महत्त्वपूर्ण संरचनात्मक सुधारणा, व्यवसाय करणे सुलभ करण्याबरोबरच, विदेशी गुंतवणूक आकर्षित करणार्या ठरल्या आहेत. भारत तंत्रज्ञानात, विशेषतः आयटी क्षेत्रात जागतिक आघाडीवर आहे. या क्षेत्रातील नवकल्पना, आर्थिक वाढीला चालना देते आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करते. सरकारने पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. त्याचबरोबर, अक्षय ऊर्जा आणि डिजिटलायझेशनला प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारचे हे उपक्रम नवीन संधी निर्माण करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहेत.
एकीकडे जागतिक अर्थव्यवस्थेत भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना, चीन वाढत्या आव्हानांचा सामना करत आहे. म्हणूनच या निर्देशांकात झालेली त्याची घसरण ही अपेक्षित अशीच आहे. चीनची मंदावलेली वाढ त्याला कारणीभूत आहे. अलीकडच्या वर्षांत चीनची आर्थिक वाढ मंदावली असून, त्याचा थेट फटका त्याचा व्यापार आणि तंत्रज्ञानक्षेत्राला बसला आहे. चीनमध्ये कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. वाढत्या कॉर्पोरेट तसेच सरकारी कर्जामुळे, आर्थिक स्थिरता आणि संभाव्य आर्थिक जोखमींबद्दल चिंता निर्माण होते. भौगोलिक-राजकीय तणाव आणि धोरणातील बदल, विशेषत्वाने तंत्रज्ञानक्षेत्र, व्यवसाय आणि गुंतवणुकदारांसाठी अनिश्चितता आणणारे ठरत आहेत. त्याचबरोबर, चिनी रिअल इस्टेट क्षेत्रालाही लक्षणीय मंदीचा सामना करावा लागत आहे. चिनी अर्थव्यवस्था म्हणूनच मोडकळीला आली आहे.
भारताचा वाढता विकासदर देशात अधिकाधिक थेट विदेशी गुंतवणूक, आकर्षित करणारा ठरला आहे. गुंतवणुकदार वाढीच्या क्षमतेचा अधिकाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून, भांडवलाचा हा वाढता प्रवाह पुन्हा एकदा आर्थिक विकासाला चालना देणारा आहे. जागतिक स्तरावर भारताचा वाढलेला आर्थिक स्तर, आंतरराष्ट्रीय मंचांवर त्याचा प्रभाव वाढवत असून, त्याचा राजनैतिक लाभ थेट मिळत आहे. भारतीय व्यवसायांना जगभराची दारे यातून खुली झाली असून त्यांना विस्तार, नवकल्पना आणि रोजगारनिर्मितीच्या संधी मिळत आहेत. निर्देशांकातील हा बदल गतिशील आणि विकसित परिस्थिती दर्शवणारा आहे. भारताच्या शाश्वत आर्थिक वाढीसाठी, उदयोन्मुख बाजारपेठेची क्षमता अधोरेखित करणारी ही घटना म्हणून याकडे पहावे लागेल. जगभरातील गुंतवणुकदारांचे लक्ष भारताकडे यामुळे वेधले जाणार आहे. दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घडामोड आहे, असेही म्हणता येते. ‘आशियातील नवा वाघ’ अशा शब्दांत माध्यमांनी भारताला गौरवले आहे. आशियाच्या आर्थिक परिदृश्यात बदल घडला आहे. सातत्याने जीडीपीत राखलेली वाढ, जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाकत, तिसर्या क्रमांकाकडे सुरू ठेवलेली वाटचाल आणि जागतिक मंदीच्या काळातही अर्थव्यवस्थेने दाखवलेली लवचिकता हे भारताच्या प्रगतीचे प्रमुख कारण आहे, हे निश्चित.