मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dharavi Mosque Breaking) धारावीतील ९० फूट रस्त्यावर असलेल्या 'मेहबूब-ए-सुबानिया' मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतः ट्रस्टच्या माध्यमातून हटवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेकडून ट्रस्टला देण्यात आलेल्या अल्टिमेटमनंतर सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी ट्रस्टने हे पाऊल उचलले आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता दि. २१ सप्टेंबर रोजी धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमलेल्या जमावाने गाड्यांची तोडफोड केल्याचे त्यावेळी दिसून आले.
हे वाचलंत का? : अवैध मशीदप्रकरणी जबलपूर येथे हिंदू एकवटले
'मेहबूब-ए-सुबानिया' मशिदीचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. त्यानंतर पालिका कर्मचारी कारवाईकरीता आले असता त्याठिकाणी जमलेल्या जमावाने पालिकेच्या वाहनांची तोडफोड केली. त्यादरम्यान मशिदीच्या विश्वस्तांनी महापालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी चार ते पाच दिवसांची मुदत मागितली होती. तसे न झाल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा अल्टिमेटम पालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला होता. त्यानुसार नऊ दिवसांनंतर ट्रस्टकडूनच ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहबूब-ए-सुबानिया मशीद ६० वर्षांहून अधिक जुनी आहे. या मशिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नव्हता. जेव्हा ही मशीद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस दोन मजले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला.