मंदिरांचे सरकारीकरण नव्हे, सामाजिकीकरण व्हावे – विहिंपची भूमिका

    24-Sep-2024
Total Views |
vishwa hindu parishad


नवी दिल्ली :   तिरुपती मंदिरातील प्रसादाची गंभीर विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) आता मंदिरांचे सरकारीकरण न करता त्यांचे सामाजिकीकरण केले पाहिजे, असे म्हटले आहे. विहिंपचे केंद्रीय सह सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले, तिरुपती बालाजी मंदिराच्या मिळणाऱ्या महाप्रसादावर हिंदुत्वनिष्ठांची अपार श्रद्धा आहे.

दुर्दैवाने हा महाप्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात गाय, डुकराची चरबी आणि माशाच्या तेलाची भेसळ होत असल्याच्या अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक बातम्या येत आहेत. संपूर्ण देशातील हिंदू समाज संतप्त असून हिंदूंचा संताप वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होत आहे. या दुर्दैवी गुन्ह्याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी होऊन दोषींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे ते म्हणाले.


तिरुपती बालाजी आणि इतर ठिकाणी होत असलेल्या गैरप्रकारांमुळे, सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्याशिवाय आपल्या मंदिरांचे पावित्र्य राखता येणार नाही, असा हिंदू समाजाचा विश्वास आता दृढ झाला आहे, असे डॉ. जैन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हिंदू मंदिरांच्या संपत्तीचा आणि उत्पन्नाचा उपयोग मंदिरांच्या विकासासाठी आणि हिंदूंच्या धार्मिक कार्यासाठीच केला जावा, अशी प्रस्थापित धारणा आहे. "हिंदू कारणांसाठी हिंदू धर्माची संपत्ती." हे सर्वमान्य तत्त्व आहे. त्यामुळे बेकायदेशीर आणि अनैतिक व्यवसायाखाली घेतलेली सर्व मंदिरे त्वरित मुक्त करून एका विशिष्ट व्यवस्थेखाली हिंदू संत आणि भक्तांच्या ताब्यात द्यावीत, असेही डॉ. जैन यांनी नमूद केले आहे.