पुण्यात इस्कॉन मंदिरात ५००० परिवारांनी श्रीकृष्णाला केला अभिषेक
जन्माष्टमीनिमित्त आयोजित "कृष्णसमर्पण" महोत्सवाची सांगता
28-Aug-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pune ISKCON Temple) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नजडीत वस्त्रालंकारानी सजलेल्या राधाकृष्णाचे रुप पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी बालकृष्णाचा पाळणा गायला. सुमारे ५००० परिवारांनी भगवंतांना अभिषेक केला. मंदिरामध्ये जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसांच्या 'कृष्णसमर्पण' सांस्कृतिक महोत्सवाचा समारोपात मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्त मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जवळपास दोन लाख भाविकांनी जन्माष्टमीच्या दिवशी राधाकृष्णाचे दर्शन घेतले. खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, उल्हास पवार यांची प्रमुख उपस्थिती सोहळ्याला होती. मंदिर परिसरात नित्योत्सवावर आधारित सुंदर देखावे निर्माण केले होते. वर्षभर इस्कॉन मंदिरांमध्ये होणाऱ्या निरनिराळ्या उत्सवांचे प्रतिबिंब ह्या नित्योत्सवात दिसत होते.
भगवान राधा कृष्णाचे वस्त्र नवरत्न ह्या कल्पनेवर आधारित होते. वेगवेगळ्या रत्नांनी आणि मौल्यवान खड्यांनी वस्त्र आभूषित केले होते. रात्री भगवान श्रीकृष्णावर ७५ कलशांमधून मंदिरातील भक्तवृंदातर्फे महाअभिषेक करण्यात आला. २५० प्रकारचे नैवेद्य दाखवण्यात आले. बरोबर रात्री १२ वाजता आरती करण्यात आली. अशी माहिती अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांनी दिली. उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमांबद्दल सांगितले.
महोत्सवात देशभरातून १००० कलावंत, २०० बालकलाकार आणि ५० संस्थांनी आपापली कला भगवंतांना समर्पित केली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात आले होते. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजीचे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.