सावधान! भारतात टेलिग्रामवर बंदी येणार? तुमचेही यावर खाते नाहीना, टेलिग्रामप्रकरणी तपास!
27-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : मेसेजिंग अॅप टेलिग्रामच्या सीईओला फ्रान्समध्ये अटक झाली असताना टेलिग्रामवर भारतात बंदी घालण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार टेलिग्रामच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाच्या हालचालींची चौकशी करत आहे. यात खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी स्वरुपाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. तपासाच्या आधारे, टेलिग्रामवर देशातह बंदी घातली जाऊ शकते.
दरम्यान, टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना दि. २४ ऑगस्ट रोजी फ्रान्समधील विमानतळावरून अटक करण्यात आली. आता त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असून खंडणी आणि जुगार यासारख्या बेकायदेशीर कृत्यांप्रकरणी सरकार टेलिग्रामची चौकशी करत आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. तपासातील निष्कर्षांनुसार मेसेजिंग ॲपवरही बंदी घातली जाऊ शकते. ॲपवरील गुन्हेगारी कारवाया रोखण्यात अपयश आल्याने ताब्यात घेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे, असे अधिकारी म्हणाले.
भारतातील ५ दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेले प्लॅटफॉर्म ब्लॉक केले जाऊ शकते. परंतु, या प्रकरणातील तपासात जे काही समोर येईल त्यावर आधारित निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्याने सांगितले. मागील वर्षांत टेलिग्राम आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गुन्हेगारी स्वरुपाच्या कृत्यांकरिता अनुकूल वातावरण म्हणून उदयास आले आहेत, ज्यात घोटाळ्यांसह नागरिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे.