नांदेड : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सोमवार, २६ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपासून वसंत चव्हाण यांची प्रकृती ठीक नव्हती. सुरुवातीला त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान, सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
वसंत चव्हाण यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला. वसंत चव्हाणांनी २००९ मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दिला सुरुवात झाली.