ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Anand Dighe Death Anniversary) ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी गुरू आनंद दिघे यांच्या समाधीस्थळ असलेल्या शक्ती स्थळालाही भेट दिली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी आनंद दिघे यांच्या विचारांवर वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शक्ती स्थळावर अभिवादनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श कायमच प्रेरणादायक राहिला आहे आणि त्यांच्या विचारांमुळेच शिवसैनिकांच्या मनात त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या विचारांवर आधारित कार्य करत राहण्याची प्रेरणा घेण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
ठाण्यातील शिवसैनिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करून, त्यांचे कार्य पुढे नेण्याचा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला. शक्ती स्थळावरील या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये एकजूट आणि सामर्थ्याची भावना निर्माण केली.कार्यक्रमानंतर ठाण्यातील विविध भागातून शिवसैनिकांनी शक्ती स्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली, आणि दिघे यांच्या कार्याचा आदर व्यक्त केला.