उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिली खरी. पण, ती वल्गना, धमकी की अस्सल आव्हान, हे अजून गुलदस्त्यातच आहे. ते यांपैकी काहीही असले तरी, ठाकरेंना आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसू लागलेल्या पराभवाचीच ही पहिली चाहूल म्हणावी लागेल.
आज खर्या अर्थाने भाजपनंतर संघटना ठीकठाक असलेला, कसा का असेना नेता असलेला दुसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणजे शिवसेना. त्यामुळे मराठी माध्यमे उद्धव ठाकरे जे काही बोलतात, त्याकडे लक्ष नक्कीच देतात. त्यातून उद्धव ठाकरेंना एखादा संदर्भही मिळून जातो. काल मात्र उद्धव ठाकरे जे काही बोलून गेले, त्यातून सनसनाटी आली. पण, त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याच कार्यकर्त्याने उद्धवजींना प्रतिसाद म्हणून ‘आवाज कोणाचा’वाली आरोळीही दिली नाही. उद्धव ठाकरे तसेही बिनबुडाची विधाने करण्यात प्रसिद्ध आहेत. ‘मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग’ ते ‘कोमट पाणी प्या’ असे कितीतरी बिल्ले उद्धवजी आपल्या छातीवर अभिमानाने लावून हिंडत असतात. त्यात भरीस भर म्हणून संजय राऊतही उरलीसुरली कसर पूर्ण करतात. त्यामुळे काळू-बाळूचा हा बहुरंगी तमाशा उद्धवजींचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर जरा जोरातच रंगला आहे.
खरं तर उद्धव ठाकरेंची जीभ म्हणा प्रारंभीपासूनच तशी सैल सुटलेली आणि बेलगाम. आपले वक्तृत्व हिंदुहृदयसम्राटांसारखे अगदी रोखठोक आणि शिवराळ, असा त्यांचा गोड गैरसमज असावा. कारण, उद्धव ठाकरेंची भाषणं, त्यांची विरोधकांवरील टीका म्हणजे निव्वळ टोमणेबाजीच! जसजशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील, तसा ठाकरेंच्या तर्कहीन वाणीचा दर्जाही असाच खालवणार, हे वेगळे सांगायला नको. परवाच्या रंगशारदातील कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात ठाकरेंमधील कुत्सितपणाच्या याच दर्पाचे दर्शन घडले. फडणवीसांवर तोंडसुख घेताना, एकेरी भाषेचा प्रयोग करण्याचा उद्दामपणा ठाकरेंनी केला. ठाकरे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकांनंतर भाजपची उरलीसुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करुन मी उभा राहिलो. यापुढे राजकारणात एक तर तू राहशील किंवा मी राहीन.” ठाकरेंचे हे विधान एखाद्या पक्षप्रमुखाच्या तोंडी अशोभनीयच. ‘तू राहशील किंवा मी’ ही असली टोकाची विधाने आपल्या कट्टर शत्रूसाठीच रणांगणात शोभणारी किंवा एखाद्या चित्रपटातील संवादासाठी साजेशी. त्यामुळे ठाकरेंच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हे त्यांचे केवळ ‘राजकीय विरोधक’ नाहीत, तर आता ‘राजकीय शत्रू’च झाले आहेत, हे दुर्देव.
कारण, काही दिवसांपूर्वीच ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फडणवीस म्हणाले होते की, “उद्धव ठाकरे आणि आम्ही एकमेकांचे शत्रू थोडेच आहोत; राजकीय विरोधक आहोत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाच आहेत. बाकी गोष्टींच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्यायच्या, हे नंतर पाहू. त्या शुभेच्छा फक्त जनताच देऊ शकते.” त्यामुळे ‘राजकीय विरोधक’ आणि ‘राजकीय शत्रू’ यांमधील तारतम्य फडणवीसांनी आपल्या उक्ती आणि कृतीतून वेळोवेळी पाळले. ठाकरेंवर टीका करतानाही फडणवीसांनी आपली पातळी कधी सोडली नाही. तरीही बरेचदा ठाकरेंनी फडणवीसांच्या शरीरयष्टीवरुन यथेच्छ हेटाळणीचेेही ओंगळवाणे दर्शन घडविले. परंतु, हेच उद्धव ठाकरे जेव्हा अंथरुणाला खिळून होते, तेव्हा त्यांच्यावर अशी कोणतीही अभद्र शारीरिक टीका-टिप्पणी फडणवीसांकडून कधीही झाली नाही. उलट ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस पंतप्रधानांनी आपल्याकडे केल्याचेही फडणवीस यांनी एकदा सांगितले होते. पण, त्यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस करणार्या देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना ‘अफजलखानाची फौज’ संबोधताना हेच ठाकरे क्षणभरही कचरत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही राजकीय साधनशुचितेची किमान अपेक्षाही बाळगणे मुळी फोल ठरावे. म्हणूनच आता एका गल्लीतल्या गुंडाच्या तोंडी शोभेल, अशी ‘गुर्मी उतरवण्याची’ ठाकरेंची अर्वाच्च भाषा, त्यांच्या मनात भाजपविषयी, भाजप नेत्यांविषयी किती पराकोटीचा द्वेष ठासून भरला आहे, त्याचेच द्योतक म्हणावी लागेल.
ठाकरेंच्या वाचाळवीरतेचे निलाजरे प्रयोग महाराष्ट्राला नवीन नाहीत. भाजपची साथ सोडून मविआ आणि पुरोगामी कंपूत शिरल्यापासून त्यांनाही ‘ग’ची बाधा झाली. हिंदुत्वाचीही शकले पाडण्याचा उथळपणा ठाकरेंनी केला. ‘आमचे हिंदुत्व, भाजपचे हिंदुत्व, संघाचे हिंदुत्व, शेंडी-जानव्याचे हिंदुत्व’ वगैरे बाष्कळ बडबड करुन मुद्दाम हिंदुत्ववादी विचारांमध्येही संभ्रमाची बीजे पेरण्याचे कुटिलोद्योग ठाकरेंनीच केले. राम मंदिराच्या देणगी अभियानापासून ते रामललाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेवरही ठाकरेंनी अशीच आक्षेपार्ह विधाने केली. “राम मंदिर उद्घाटनानंतर अयोध्येहून परतताना पुन्हा गोध्रासारख्या दंगली भडकतील,” असाही वादग्रस्त दावा ठाकरेंनी केला होता. पण, असे काहीही घडले नाहीच, उलट रामललाच्या अयोध्येतील स्वागत सोहळ्यात अवघा देश राममय झाला. मुळात हीच ठाकरेंची खरी पोटदुखी. अयोध्येचे रामजन्मभूमी आंदोलन, राम मंदिर यांच्या समर्थनार्थ कोणेएकेकाळी भाजपसोबत भूमिका घेणार्या शिवसेनेला, उद्धव ठाकरेंमुळे त्याच मंदिराला दुषणे देण्याची दुर्बुद्धी सुचली. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा मोह आणि सत्तेच्या लालसेने ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिकेला तिलांजलीच दिलीच. पण, सुषमा अंधारेसारख्या हिंदू धर्म, महाराष्ट्रातील संतपरंपेचा पाणउतारा करणार्या हिंदुद्वेष्ट्यांनाही ठाकरेंनी पक्षात मानाचे स्थान दिले. त्यामुळे एकूणच भूमिका आणि भाषा या दोन्ही कसोट्यांवर ठाकरे आजवर सपशेल अपयशीच ठरले.
हिंदुत्वापासून फारकत घेत, महाराष्ट्राची सत्ता हाती आल्यानंतरही ठाकरेंच्या क्रियाशून्यतेमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसली. फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरु झालेल्या कित्येक विकासप्रकल्पांवर ठाकरेंनी स्थगितीची कुर्हाड चालवली. पर्यावरणाच्या नावाखाली आरे मेट्रो कारशेडचे काम थांबवल्यामुळे, या प्रकल्पाची किंमत तब्बल दहा हजार कोटींनी वधारली. आधीच कोरोनाची महामारी आणि त्यात ठाकरेंच्या राजकीय साठमारीने अवघा महाराष्ट्र खचला. पालघरचे साधू हत्याकांड, 100 कोटींची वसुली, अंबानींच्या बंगल्याबाहेर स्फोटक पेरणे यांसारख्या कित्येक प्रकरणांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने अक्षरश: झुकली. उद्योगधंद्यांनी राज्यातून पलायन केले. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न मोदी सरकारवर ढकलणार्या याच ठाकरेंमुळे, आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईतही महाराष्ट्राची हार झाली. त्यामुळे ठाकरेंची मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांची कारकिर्द ही केवळ अहंकाराने भरलेली, निराशाजनक आणि निष्क्रिय ठरली. त्यामुळे फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून रोवलेली विकासाची मुहुर्तमेढ आणि ठाकरेंनी त्या विकासाला लावलेला सुरुंग, यांची मुळी तुलनाच होऊ शकत नाही.
फडणवीस हे एक कसलेले राजकीय नेते आणि तितकेच उत्तम प्रशासक. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते एक संयमी आणि सुसंस्कृत राजकीय नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. पण, फडणवीसांच्या याच संयमाला आणि सुसंस्कृतपणाला त्यांचा राजकीय दुबळेपणा समजण्याची चूक उद्धव ठाकरे वाकंवार करताना दिसतात. त्यांनी लक्षात घ्यावे की, एका पिसाने कोणी मोर होत नसतो, तसे केवळ लोकसभा निवडणुकांच्या निकालांवरुन ठाकरेंनी विधानसभेत आपल्या विजयाचे आधीच ढोल बडवणे बंद करावे. शेवटी रामदास स्वामी ‘मूर्खांची लक्षणे’ सांगूनच गेले आहेत-
तोंडाळासी भांडों नये। वाचाळासीं तंडों नये।संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं॥