रशिया दौरा! पुतीन बनले मोदींचे सारथी; म्हणाले, "मोदींनी भारतासाठी..."

    09-Jul-2024
Total Views |
 RUSSIA
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. सोमवारी ते मॉस्कोच्या वनुकोवो-२ विमानतळावर पोहोचले, तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. सोमवारी रात्री पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. भारताच्या विकासात पंतप्रधान मोदींच्या योगदानाचे पुतीन यांनी कौतुक केले.
 
पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, "पंतप्रधान म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मला तुमचे अभिनंदन करायचे आहे. मला वाटते की हा योगायोग नसून तुमच्या अनेक वर्षांच्या कामाचे फळ आहे." ते पुढे म्हणाले, "तुमच्याकडे स्वतःच्या कल्पना आहेत. तुम्ही एक उत्साही व्यक्ती आहात. तुम्ही नेहमीच भारत आणि भारतीय लोकांच्या हिताचे परिणाम साध्य करू शकाल. त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे."
 
राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपले जीवन भारतातील लोकांसाठी समर्पित केले. पुतीन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले की, "भारतातील जनतेने त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची आणखी एक संधी दिली आहे. माझं एकच ध्येय आहे, लोकांची आणि देशाची सेवा करणं."
 
दोन्ही नेत्यांनी मॉस्कोबाहेरील अधिकृत निवासस्थानी चहापानावर अनौपचारिक चर्चा केली. यादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना इलेक्ट्रिक कारमधून फिरायला नेले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करताना मोदी म्हणाले, "मी उद्याही आमच्या चर्चेची वाट पाहत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील." रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.