अनधिकृत फेरीवाल्यांचे एकूण ५,४३५ साधनसामुग्री महापालिकेकडून जप्त!

    05-Jul-2024
Total Views |
Unauthorized hawkers bmc action

मुंबई : महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत दिनांक १८ जून ते ०४ जुलै २०२४ पर्यंत सतरा दिवसात विविध विभागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली आहे. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे ५ हजार ४३५ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात १ हजार १८६ चारचाकी हातगाड्या, १ हजार ८३९ घरगुती गॅस सिलिंडर आणि २ हजार ४१० इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.

मुंबईकरांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते. त्यासंदर्भातील निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीसांची संयुक्त कार्यवाही सुरू आहे. या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत.

कारवाईत जप्त केलेल्या साधनसामुग्रीचा तपशील

जप्त साधनांची एकूण संख्या – ५,४३५

- चारचाकी हातगाड्या - १,१८६

- सिलिंडर – १,८३९

-स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारचे साहित्य – २,४१०