नवीन ठाणे रेल्वे स्थानक परिचलन क्षेत्रातील कामे रेल्वेच करणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही ठाणे महापालिकेचे १८५ कोटी वाचणार

    04-Jul-2024
Total Views |

Ashwini vaishnav
 
ठाणे : केंद्र व राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेच्या प्रयत्नामुळे मनोरुग्णालयाच्या सुमारे १४ एकर जागेवर ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिचलन क्षेत्रातील सर्व कामे रेल्वे मंत्रालयाच्यावतीने करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली.यासाठी लागणारा निधीही रेल्वे मंत्रालय देईल असे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के तसेच कल्याणचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाजे १८५ कोटी वाचण्यास मदत होणार आहे. दिल्लीत रेल भवन येथे नुकत्याच झालेल्या या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे उपस्थित होते.
 
ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर,परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येणार आहेत. ही कामे जलदगतीने व्हावीत आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर तातडीने निर्णय व्हावा. तसेच, परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या निधीमधून करावी यासाठी ठाणे- कल्याणच्या खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली.
 
यावेळी आयुक्त राव यांनी प्रकल्पाविषयीची पार्श्वभूमी मांडली. तर खासदार द्वयीने प्रकल्पाची कामे रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या निधीमधून करण्याची विनंती केली. त्यानुसार केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी रेल्वे परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे ही रेल्वे मंत्रालय त्यांच्या निधीतून करेल. या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालय करेल अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर परिचलन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम सोडून उर्वरित कामासाठी रेल्वेच्या ना हरकत घेण्याची तरतूदही रद्द करण्यात यावी ही मागणी देखील रेल्वे मंत्र्यांनी मान्य केली. यामुळे ठाणे महापालिकेची १८५ कोटीची बचत होणार आहे.