मुंबई :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नसा-नसांत अहंकार आणि गर्व निर्माण झालाय. मराठा समाजाच्या पाठबळावर निर्माण झालेला हा अहंकार कमी करा. जो अहंकाराची भाषा करतो तो संपलेला आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असे खडेबोल दरेकरांनी जरांगे यांना सुनावले. माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, जरांगेंच्या नसा-नसांत अहंकार आणि गर्व आलाय.
तुम्ही जो विषय घेतलात तोच विषय मराठा समाजातील कार्यकर्ते पुढे नेत असतील तर ते मराठा समाजाचे आंदोलन नाही हे तुम्ही कसे सांगू शकता. तुम्ही करता ते मराठा समाजाचे आंदोलन आणि मराठा समाजाच्या इतर संघटनांनी केले तर ते सवतीचे आंदोलन, हे योग्य नाही. मराठा समाजाच्या पाठबळावर जो अहंकार तुमच्यात निर्माण झालाय तो कमी करा, अशी विनंतीही दरेकरांनी केली. तसेच सरकारला गर्व असता तर डझनभर मंत्री, अनेक निवृत्त न्यायाधीश तुमच्या पायाशी बसून चर्चा करायला आले नसते. मुख्यमंत्री स्वतः वाशीला आले नसते.
मराठा समाजाच्या भावना तुम्ही पायदळी तुडवताय. किती दिवस समाजाला खोटे चित्र दाखवणार. एका गोष्टीचा पर्दाफाश मी काल केलाय. आम्ही राजकारणात पदांसाठी आलेलो नाही. सामाजिक बांधिलकीतून आम्ही राजकारणाला सुरुवात केली. भाजपा हा सेवेसाठी पक्ष आहे. कुणाला आमदार, खासदार, मंत्री व्हायचे यासाठी नाही. अनेक आले नी गेले. जो संपविण्याची आणि अहंकाराची भाषा करतो तेच संपलेत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असेही दरेकरांनी जरांगेंना सुनावले.
दरेकर पुढे म्हणाले की, ज्यांना सहकार कळत नाही शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि विकास हे मूळ उद्देश न समजता मुंबई बँकेत प्रविण दरेकर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कामं चालते एवढेच त्यांना दिसते. आमचे सरकार आहे एवढाच संदर्भ त्यांना कळतो. यशदा सारखे ट्रेनिंग सेंटर पुण्यात आहे. आज सहकाराला उर्जितावस्था देणे आवश्यक आहे. पूर्वीचा सहकार आणि सद्य स्थितीतील सहकारात जमीनआस्मानचा फरक आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सहकाराला विशेष महत्व देताहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. इथे एखादे ट्रेनिंग सेंटर असावे या भूमिकेतून ही गोष्ट होतेय. परंतु ज्यांना केवळ राजकारण दिसते ते अशा संशोधनात तडफडत राहणार. चांगल्या कामाची तगमग त्यांना समजत नाही. एक मोठे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारण्याचा मुंबईतील सहकार चळवळीचा मानस आहे. गोरेगावला हौसिंगची सहकार परिषद झाली त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्र्यांनी मुंबईकरांना याबाबत शब्द दिला होता त्याची पूर्तता करण्याचा हा प्रयत्न होता.
त्याचबरोबर विजय वडेट्टीवार, संजय राऊत यांनी महाराष्ट्रात कुणीकुणी भूखंड घेतलेत, कोणत्या सामाजिक उद्देशाकरिता घेतलेत आणि ते व्यवसायिक उपयोगासाठी वापरले जाताहेत याकडे लक्ष टाकावे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था, नाट्य परिषदेची माहीम येथील जागा असेल त्या शासनाने दिल्या. वास्तू दुसऱ्याच्या पैशातून उभ्या राहिल्या आणि त्याचे नेतृत्व कोण करतोय. लाखोच्या प्रमाणात भाडे कोण खातोय? याची माहिती घ्यावी.
म्हणजे व्यावसायिक वागणारी लोकं कोण आहेत हे महाराष्ट्रासमोर येईल. दरेकर पुढे म्हणाले की, संजय राऊत यांनी कधी एक संस्था चालवली नाही. संस्थेच्या माध्यमातून कुणाला मदत केली नाही. त्यांचा एककलमी कार्यक्रम टीका करणे हा आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही किती कामं केलेय हे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना माहित आहे. राजकारणासाठी राजकीय बोलावे लागते ते संजय राऊत बोलत आहेत.
सावरकरांचे हिंदुत्व हा आमचा विचार
दरेकर म्हणाले की, सावरकरांच्या आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या बाबतीत भाजपा कालही-आजही आक्रमक होती आणि राहील. सावरकरांचे हिंदुत्व घेऊन त्याचे उदात्तीकरण करणे हे आमचे कर्तव्य राहील. आमचा तो राजकीय अजेंडा नाही. सावरकरांचे हिंदुत्व हा आमचा विचार, संस्कार आहे. सावरकरांना भारतरत्न द्यायचा की अजून कुठला सन्मान द्यायचा याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल. परंतु सावरकरांच्या विचारांचा सन्मान पदोपदी भाजपा करतेय आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत तुमचा पक्ष पदोपदी सावरकरांचा अपमान करताना दिसतेय.