पुणे अपघात प्रकरण! वडील आणि आजोबाला जामीन मंजूर, पण विशाल अग्रवाल...

    03-Jul-2024
Total Views |

Pune accident
 
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालनंतर आता त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही जामीन मिळाला आहे. कार चालकाला डांबून ठेवल्याचा त्या दोघांवर आरोप आहे.
 
मंगळवारी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, जामीन मिळाल्यानंतर अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालची तुरुंगातून सुटका होणार असली तरी, सध्या आरोपीचे वडील विशाल अग्रवालला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत भरा अर्ज
 
या अपघात प्रकरणात विशाल अग्रवालवर अनेक आरोप आहेत. त्यामुळे तीन पैकी २ गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला असला तरी ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याच्या आरोपात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. या प्रकरणात विशाल आणि शिवानी अग्रवाल हे दोघेही सध्या येरवडा कारागृहात आहेत.
 
दुसरीकडे, सोमवारी महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीची सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.