‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी धोरण आखा : देवेंद्र फडणवीस

सर्वतोपरी आर्थिक साहाय्य करण्याची दिली हमी

    27-Jul-2024
Total Views |

Devendra fadanvis
 
मुंबई : “मुंबईच्या परिवहन सेवेला सक्षम करायचे असेल, तर ‘बेस्ट’ला अधिक बळकट करावे लागेल. त्याशिवाय, एकात्मिक प्रणाली विकसित होऊ शकणार नाही, जी सिंगल अ‍ॅपवर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी धोरण आखा,” अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. 26 जुलै रोजी केली. ‘बेस्ट’ कामगारांना सेवेमधील विविध लाभ वाटपाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्यासह श्रमिक उत्कर्ष सभेचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. देशातल्या कुठल्याही भागात जा, तेथे रांगा लावून बसमध्ये चढणारे प्रवासी दिसणार नाहीत. ते फक्त मुंबईत दिसतील.”
 
“मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोसेवा यासाठी यशस्वी झाल्या, कारण तेथील बससेवा सक्षम आहे. या संसाधनांना एकत्र जोडण्याचे काम बससेवा करीत असते. बस कुठेही पोहोचू शकते. त्यामुळे आपल्याला मुंबईच्या परिवहन सेवेला सक्षम करायचे असेल, तर बेस्टला अधिक बळ द्यावे लागेल. असे झाल्यास एकात्मिक प्रणाली विकसित होऊ शकेल, जी सिंगल अ‍ॅपवर आणायचा आपला प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
 
“जगाच्या पाठीवर कोणतीही अशी परिवहन सेवा नाही, जी फायद्यात आहे. कारण, परिवहन सेवा फायद्याकरिता चालवायची नसते. ती लोकांच्या सोयीकरिता चालवायची असते. सार्वजनिक सेवा बंद केली, तर प्रदूषणाची पातळी कैक पटीने वाढेल. त्यामुळे बेस्टला मजबूत करण्यासाठी धोरणाची गरज आहे. ते लवकरात लवकर आखा. त्याला आर्थिक साहाय्य करण्याची जबाबदारी माझी राहील. पालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सहकार्याने बेस्टला बळकट करू,” अशी हमी फडणवीस यांनी दिली.
 
‘बीडीडी’ शहरी पुनर्विकासाचे सर्वात मोठे मॉडेल “बीडीडी’च्या पुनर्विकासासंदर्भात 25 वर्षांत नुसत्या घोषणा झाल्या. 120 फुटांच्या खोलीत मराठी माणसाच्या दोन पिढ्या गेल्या, पण त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. आम्ही सत्तेवर आल्यानंतर निर्णय घेतला, बिल्डरला जागा न देता, ‘म्हाडा’च्या माध्यमातून पुनर्विकास करू. त्यामुळे 120 फुटांऐवजी 500 चौ. फुटांचे घर मिळाले. बीडीडी पुनर्विकास योजना ही जगातील शहरी पुनर्विकासाचे सर्वात मोठे मॉडेल आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत!
“उद्धव ठाकरे आणि आम्ही एकमेकांचे शत्रू थोडेच आहोत; राजकीय विरोधक आहोत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाच आहेत. बाकी गोष्टींच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्यायच्या, हे नंतर पाहू. त्या शुभेच्छा फक्त जनताच देऊ शकते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
राज्यातील पूरस्थितीतसंदर्भात माहिती देताना फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर सातत्याने आम्ही नजर ठेवून आहोत. सिंचन विभाग, जिल्हा प्रशासन तसेच विविध राज्यांसोबत योग्य प्रकारचा समन्वय राखला जात आहे. अलमट्टी धरणाची पातळी स्थिर राखली गेली आहे. कर्नाटक सरकार आणि तिथल्या सिंचन विभागाशी सातत्याने समन्वय राखला जात असून आपले काही अधिकारी तिथे हजर आहेत.
 
अलमट्टी धरणाबाबत कर्नाटक सरकार आणि तिथल्या सिंचन विभागाशी समन्वय सुरू आहे. आपले अधिकारी तिथे आहेत. योग्य पातळी राखली पाहिजे, जेणे करून पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. हे समन्वय सुरू असले, तरी एकावेळी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तेव्हा विसर्ग वाढवावा लागतो. असा विसर्ग वाढविल्यावर काही प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होते. काल एका दिवसात कोयनेत सहा टीएमसी पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढवावा लागला होता,” असे फडणवीस म्हणाले.
 
खडकवासल्याचा विसर्ग केला कमी दरम्यान, “खडकवासल्याचा विसर्ग आता 40 हजारांवरून 14 हजार क्युसेक्सवर आला आहे. शिवाय, कोयनेचा विसर्ग 20 हजार क्युसेक्सपर्यंत आला आहे,” अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. तसेच, “पुरावा धोका लक्षात घेत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट सांगितली जात आहे. आवश्यक तयारी केली जात आहे. जिथे आवश्यक तिथे जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’वर आहे. सोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके ‘अलर्ट’वर ठेवली आहेत. या सर्व परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असून समन्वय सुरू आहोत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.