वरळी हिट अॅन्ड रन प्रकरणातील अनाधिकृत बारवर पालिकेने फिरवला बुलडोजर!

जुहू येथील अनधिकृत व्‍यावसायिक बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई!

    10-Jul-2024
Total Views |

वरळी
 
मुंबई : जुहू येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम मुंबई महापालिकेने तीव्र केली आहे. जुहू चर्च मार्गावरील 'व्‍हाईस ग्‍लोबल तपस बार' ने केलेल्‍या अंदाजे ३ हजार ५०० चौरस फुटाच्‍या वाढीव, अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या वतीने दि. १० जुलै रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. स्‍वयंपाकघर, तळमजला आणि बंदिस्‍त छतावरील वाढीव, अनधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात आला. वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहने यांच बारमध्ये पार्टी केल्ययाची माहिती आहे.
 
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त (परिमंडळ - ४) विश्वास शंकरवार आणि सहायक आयुक्त (के पश्चिम) चक्रपणी अल्‍ले यांच्या नियंत्रणाखाली अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी २० कामगार, मनुष्यबळासह १ जेसीबी संयंत्र, इलेक्ट्रिक ब्रेकर्स, गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
 
तसेच, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधिकारीदेखील या कारवाईवेळी उपस्थित होते. जुहू चर्च मार्गावर किंग्‍ज् इंटरनॅशनल हॉटेलजवळील 'व्‍हाईस ग्‍लोबल तपस बार' ने वाढीव, अनधिकृतपणे बांधकाम केल्‍याचे निदर्शनास आले आहे. तळमजल्‍यावरील सुमारे दीड हजार चौरस फुटाच्‍या मोकळया जागेत लोखंडी शेड घालून त्‍याचा अनधिकृतपणे वापर, छतावर सुमारे दोन हजार चौरस फुट लोखंडी शेड टाकून छत बंदिस्‍त केल्‍याचे आढळले. त्‍यानुसार, अतिक्रमण निर्मुलन पथकाने अंदाजे ३ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम दि. १० जुलै रोजी निष्कासित केले. दरम्यान, जुहू आणि परिसरामध्ये अशाप्रकारे निर्माण झालेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.